शास्त्रीय पद्धतीने विचार करणे ही एक निराळी बाब आहे, ज्या मंडळींला समाजाचा शास्त्रशुद्ध विश्लेषणासह अभ्यास करण्याची सवय आहे त्याची भूमिका कवींच्या भावनाप्रधान मनापेक्षा निराळी असणार हे आपण समजून घेतले पाहिजे. आपल्या कवितेची भूमिका सांगताना प्रा. शरद देशमुखाना राजकीय, सामाजिक, चिंतनाचा उल्लेख केला आहे. हे सामाजिक स्वतन भावनाप्रधान कवीचे आहे. शास्त्रीय अभ्यास करण्याऱ्याचे नव्हे हे आपण समजून घेतले पाहिजे.
तोंडाने कुणी मान्य करो वा न करो; जीवनात अर्थसत्ता ही अतिशय बलवान व महत्त्वाची सत्ता असते. अगदी प्राचीन काळी भारतात मानवा जीवन अर्थप्रधान आहे असे मानणारा एक गट होता. कौटिल्य हा या गटाचा प्रमुख नेता म्हटला पाहिजे. या अर्थसत्तेची जाण जुन्याकाळी फार उग्र नव्हती. भांडवलशाहीच्या उदयानंतर ही जाण अतिशय उग्र व उत्कट झालेली आहे. भांडवलशाहीच्या समाजात पैसा हे समाजाचे आद्य मूल्य असते. माणसे स्वातंत्र्य मागतात, हे स्वातंत्र्य त्यांना अमर्याद पैसा मिळविण्यासाठी हवे असते. धन गोळा करण्याचे तर स्वातंत्र्य हवे असतेच पण वाटेल त्या मार्गाने धन गोळा करण्याचेही स्वातंत्र्य हवे असते. अशा प्रकारच्या 'पैसा' हे मूल्य मानणाऱ्या समाजात मास्तराची जागा काय असणार?
आपण परंपरा म्हणून 'आचार्य देवो भव!' असे म्हणायचे. प्रत्यक्षात मास्तर हा एक कमी पगार असणारा म्हणून कनिष्ट मध्यमवर्गाचे जीवन जगणारा माणूस असतो. त्याच्यावर जबाबदारी नवी पिढी घडविण्याची आणि समाजाला वळण लावण्याची आहे असे समजावयाचे. हा मास्तर कुणाच्या तरी घरी भाड्याने राहणारा. घरमालकाच्या दृष्टीने दोन खोल्यांचे घर परवडणारा हा माणूस. किराणा दुकानदाराच्या मते शे-पन्नास रुपयांची उधारी देता येईल इतकी याची पत. वर्गात येणाऱ्या मुलांचे आई-बाप रोज घरी आपल्या मुलांना सांगणार डॉक्टर हो, इंजिनीयर हो, नाही तर वकील हो, पण मास्तर होऊ नकोस. वर्गात शिकणारी मुले ज्याच्याकडे "आपणास हा व्हायचे नाही, असे घोकीत राहणारी, त्यांच्यापुढे आदर्श ठेवण्याचे काम मास्तर काय करणारे तो दररोज शिकवितो, त्यावर त्याचा विश्वास पूर्ण बसतही नाही. त्याचा विश्वास उडतही नाही. जी स्वप्ने खोटी आहेत हे रोज अनुभवाने माहीत आहे ती स्वप्ने खरी असणारच अशा भ्रमात जगण्याची इच्छा धरणारा हा माणूस 'पैसा' हे मूल्य असणाऱ्या समाजात अप्रतिष्ठित आणि असुरक्षित असणारच