Jump to content

पान:थेंब अत्तराचे (Themb Attarache).pdf/74

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०. ग्रासलेला सूर्य


- शरद देशमुख

 माझे विद्यार्थी मित्र शरद देशमुख यांच्या कविता-संग्रहास प्रस्तावना लिहिताना मला फार आनंद होत आहे. महाविद्यालयीन जीवनापासून वाङ्‍‍मयाच्या क्षेत्रात त्यांची धडपड सतत चालू असे. वाङ्‍‍मयाच्या प्रेमाने त्यांना कवितेच्या क्षेत्रात ओढले व आज कविता-संग्रह प्रकाशित होतो आहे. या पुढील जीवनात त्यांचे वाङ्‍‍मयीन यश उत्तरोत्तर चढते-वाढते राहो अशी शुभेच्छा मी त्यांना देतो.

 कवितेचा प्रमुख सूर उद्वेगाचा व विद्रोहाचा आहे. समाज-जीवनाचे आपण एक घटक आहोत. भोवताली असणाऱ्या समाजापासून आपण वेगळे राहू शकत नाही, ही जाणीव या कवितांच्या मागे आहे. मी कवीच्या स्वातंत्र्याचा पुरस्कर्ता आहे. समाजाविषयी तू विचार केलाच पाहिजे असे बंधन कवीवर कुणी घालू नये असे मला वाटते. पण त्या बरोबरच मला हे ही वाटते की, समाजाविषयी विचार करणेच योग्य नाही असा आग्रह सुद्धा आपण धरू नये. वाङ्‍‍मयीन व्यक्तिमत्त्व दोन पातळीवर एकाचवेळी जगणारे व्यक्तिमत्त्व असते. कवी हा सुद्धा माणूसच असतो. माणूस म्हणून तो समाजातच जगत असतो. समाजातील सर्व सुख-दुःखांचा तो वाटेकरी व भागीदार असतो. पण त्याशिवाय कवी म्हणून त्याचे एक निराळे व्यक्तिमत्त्व असते. कवी म्हणून तो वेगळाच सुख-दुःखांचा अनुभव घेत असतो. काही कवींची ही दोन्ही मने एकमेकांशी संलग्न असतात, काहींची काही प्रमाणात संलग्न, काही प्रमाणात विलग असतात. काहींची पूर्ण विलग असतात. वाङ्‍‍मयाच्या क्षेत्रात आपण या सगळ्याच वैविध्याचा आदर केला पाहिजे. सामाजिक जाणीव नसेल तर ती कविताच नव्हे. या एका टोकाच्या आग्रहापासून आणि सामाजिक जाणीव असेल तर मग ती कविताच नव्हे या दुसऱ्या टोकाच्या आग्रहापासून, आपण रसिक या नात्याने दूर राहिले पाहिजे असे मला वाटते.

 कवितेचा पिंड आणि कवीमन ही एक निराळी बाब आहे. आणि समाजाचा

७२ / थेंब अत्तराचे