भिजत याही कवितेत येऊन जातो. विरागी रस्त्यावर उत्तररात्री बाभळींनी काय म्हणून आसवे ढाळावीत? अशा प्रकारचे प्रश्न याही कवीच्या जीवनात येतातच. पण या वैयक्तिक जीवनाला, त्यातील जाणिवांना शब्दरूप देण्यात कवीला फारसे यश मिळत नाही. त्याचा मुख्य स्वर हरवलेपणातच राहतो. मी सर्व धर्मांच्या सारखा बनावटी आहे, मला सर्व धर्म सारखेच आहेत, मी सर्वत्र परका आहे अशी हरवलेपणाची जाणीवच प्रमुख राहते. शहाजिंदेच्या कवितेत या सामाजिक जाणिवेलाच मध्यवर्ती स्थान आहे.
या कवितांच्या बाबतीत अजून एक गोष्ट नोंदवावी लागेल. शहाजिंदे प्राय: सर्व बाबींचा तुच्छपणे उल्लेख करीत चालतात. “पैशाची खैरात करावीशी वाटली तरी ऐपत नाही म्हणून स्वर्गाची आशाही बाळगता येत नाही.” हा असाच एक फटकारा. पापाने पैसा मिळवून पैशाने पुण्य विकत घेणाऱ्या मनोवृत्तीवर, पुनर्जन्मावर विश्वास नसला तरी एखादा पुनर्जन्म आपल्यास मिळावा कारण मग दोन आत्मचरित्रे लिहिता येतील; असे तो म्हणून जातो. आपल्या बाटग्या कानांची खैबरखिंड सगळे काही ऐकण्यासाठी मोकळी आहे अशी नोंद तो करतो, प्रश्नपत्रिका 'मॉडेल गर्ल सारख्या' असतात त्या पावित्र्य टिकवितीलच याची खात्री नसते. तुमच्या नकलांनी काजवे संघटित होतील पण सूर्य कधी हसणार नाही, असे तो सतत, तुच्छतेने बोलत राहतो. शहाजिंदेच्या कवितेतील हा तुच्छतेने भरलेला फटकळपणा स्वत:चे दु:ख पचविण्याचा प्रयत्न म्हणून पाहायला पाहिजे कारण हा कवी भाबडा आणि आशावादी नाही. तो वास्तवाचे भान बाळगणारा आणि सावध आहे. त्याचे मन कुढणारे व कडवट झालेले नाही. तो हताश आणि विफल झालेला नाही. सर्व उणिवा आणि सर्व पराभव उघड्या डोळ्यांनी मोजून इथूनही आपण पुढे जाऊ शकू असे मानणारी चिवट श्रद्धा त्याच्या जवळ आहे. म्हणूनच त्याचा तुच्छपणा सतत मिस्किलपणाचे रूप घेतो. आणि त्याची वेदना सतत समजूतदारपणाचे रूप घेत जाते.
साधी दिसणारी पण गुंतागुंतीची असणारी, गद्यप्राय वाटणारी पण उत्कट असणारी, दु:ख भोगून अधिक समजूतदार झालेली पण आक्रस्ताळेपणा हेच भांडवल न समजणारी अशी कविता घेऊन साहित्याच्या दालनात शहाजिंदे प्रवेश करीत आहेत. त्यांच्या कवितेने फार मोठ्या अपेक्षा निर्माण केल्या आहेत. ही कविता सर्व अंगांनी डवरून येऊन वाढो अशी सदिच्छा व्यक्त करीत या कवीचे मी स्वागत करतो.