आहेत. यात स्वत: कवी एकटाच उभा आहे. तो कधी आपले कपडे खुंटीवर टांगतो तर कधी कपडे धुण्याची कल्पना करतो. धो-धो वाहणारा प्रवाह आणि अजगराची सुस्ती, तुणतुणे वाजवीत फिरणाऱ्या दिंड्या आणि कोणतेच तुणतुणे नसणारा कवी यांच्यातील विरोध लय सतत डोळ्यांसमोर ठेवणे हा शहाजिंदेचा प्रयत्न असतो. यातच या कवितेचे सामर्थ्य आहे.
मधूनच शहाजिंदे यांना सुभाषितवजा वाक्ये वापरण्याचा छंद आहे. “वेडं होता येत नाही म्हणून कशाच्या तरी वेडाचं सोंग घ्यावं लागतं.' “सत्य खोटं वाटतं म्हणून भ्रमांना जवळ करावं' अशी वाक्ये ते लिहून जातात. मधून मधून उर्दू कवितांच्या आठवणी देतील अशी वाक्ये त्यांच्या कवितेत येऊन जातात. हिंदु आणि मुस्लिम संस्कृती तर त्यांच्या कवितेत सगळी सरमिसळच झालेली आहे. कवीच्याच भाषेत सांगायचे तर त्याच्या छातीवर जगन्नाथाचा रथोत्सव आणि मक्का मदिनेचा हाज या दोहोंचीही एकदा गर्दी दाटलेली आहे, सर्वांनीच ज्याचा ताबा मागितला आणि या संघर्षातच जे मुळातच फाटले असे दोन जेरुसलेम आपणच आहोत असे कवीला वाटते.
शहाजिंदे फक्त सामाजिक जाणिवांच्या मध्येच गढलेले आहेत असे नाही. आपले व्यक्तिगत जीवन निरनिराळ्या प्रेमानुभवांनी समृद्ध व्हावे अशी त्यांची इच्छा आहे. पण प्रेमात बुडून जाण्याची कवीची इच्छा असली तरी तो स्वत:च हरवलेला आहे. त्याला पुन्हा प्रेमात हरवणे कठीणच आहे. आपले मन हे पानझडीच्या काळात उगवलेले फूल आहे. कोमेजून जाण्याची प्रक्रिया चालू असतानाच उमलण्याची धडपड ते करीत राहते. या मनाच्या अंगणात एकेक जण येते आणि खेळत खेळत निघून जाते. कवीचे म्हणणे असे आहे 'तुम्ही या, खेळा आणि जा' पण लवकर जा कारण मला झोपायचे असते, एखाद्या प्राध्यापकाबरोबर देखण्या मली कॅन्टीनमध्ये चहा पिण्यास जातात आणि आपल्याला मात्र ज्ञानेश्वर शिकवत बसावं लागतं अशी कुरकुर करीत हा कवी म्हणतो, उराशी पिवळी पानं जपवीत, सावली हरवलेला वटवृक्ष अजूनही सावलीचा शोध करीत चाललेला आहे. अशा वैतागलेल्या आपल्या मनाचे स्पष्टीकरण करताना तो म्हणतो की, दलितांचा उद्वेग वजा केला तर त्यांच्या अंतर्मनाची स्पंदने माझी कविता सांगतच आहे.
तरीही त्याच्या जीवनाला प्रेमाचा सोनेरी स्पर्श झालेलाच नाही. जिंदगीची विहीर कोरताना, बांधण्याच्या नादात जिव्हाळ्याचे सर्व झरे बंद ठेवले तरी सांसारिक विहिरी पाझरतातच हे या कवीने नाकारलेले नाही. शहाळी उरोजांच्या घनगर्द जंगलातून भटकत भटकत गाभुळलेल्या स्वप्नांचा काफिला, भिजत