पान:थेंब अत्तराचे (Themb Attarache).pdf/71

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शहाजिंदे यांना एक गोष्ट जर सारखी जाणवत असेल तर ती ही आहे की, आपल्या सामाजिक जीवनात, सामाजिक आणि राजकीय भूमिकांना फार वरवरच अर्थ आहेत. कवीच्या भाषेत सांगायचे तर साम्यवादी खोकला येतो नंतर राष्ट्रीयत्वाचा घाम फुटतो. पुरोगामी हातरुमाल तोंडावरून फिरवले जातात. शहाजिंदेनी अतिशय मार्मिकपणे अशी नोंद केलेली आहे की, धर्मनिरपेक्षतेचे कपडे ठाकठीक करून खालमानेने मी त्या दिंड्यांच्या मागून चालू लागलो यातील चिमटा नीट समजून घेतला पाहिजे. तुम्ही धर्मनिरपेक्ष आहात हा मुद्दा फारसा महत्त्वाचा नाही. इतराना तुम्ही धर्मनिरपेक्ष दिसला पाहिजेत, तसे इतरांना वाटले पाहिजे. इतरांना धर्मनिरपेक्ष वाटण्यासाठी कोणत्या भूमिका घ्याव्यात हेही इथे ठरलेले आहे. म्हणून त्या दिंडीत कपडे ठाकठीक करून जावे लागते. स्वातंत्र्याच्या घोषणा करणारीही दिंडी असते आणि तेवढ्याच मूढपणे या स्वातंत्र्याच्या दिंडीतही भजन चालू असते. सर्वांच्या जवळ एक तुणतुणे लागतेच. कोणत्या तरी गर्दीत तुम्ही असलेच पाहिजे. गर्दीपेक्षा स्वतंत्र असण्याचा तुमचा हक्क स्वातंत्र्याच्या उपासकानाही मान्य नसतो. या कवी- जवळ कोणत्याच दिंडीचे तुणतुणे नाही. हे पाहताच सर्वजण त्याला टाळू लागतात. परंपरेने समृद्ध अशा सांस्कृतिक, नगरीत, कोणीच बोलण्यास तयार नाही. असा तो कवी एकटा राहतो. मंदिरातील गणपतीला डोळ्यांत डोळे रोखून विचारले, 'अरे तू तरी मला ओळखतोस की नाही?' तर त्याने ओळख देण्याचे हेतुपरस्पर टाळले. कोणच्याच कळपात आपल्याला जागा नाही म्हणून आपलाच कळप बरा यासाठी कवी स्वत:च्या कळपात परततो. धर्मनिरपेक्षतेचे कपडे खुंटीला टागून तो आपला मशिदीकडे नमाज अदा करण्यासाठी जाऊ लागतो, तेव्हा त्याच्या लक्षात येते ते ही की आपल्या अंगावर कुठलेच कपडे नाहीत. त्यामुळे आपण एकटेही आहोत आणि नागवेही आहोत.

 या कवितेच्या शेवटी कवी सांगतो, हस्तिनापुराच्या शिखरा-शिखरावरून भगीरथाच्या गंगेसारखी संपूर्ण क्रांती धो-धो वाहत होती. एक दिवस ही क्रांती आपल्याही पर्यंत येणार. ती जेव्हा आपल्या पर्यंत येईल तेव्हा अनेक डाग पडलेले धर्मनिरपेक्षतेचे कपडे आपण धुवून घेऊ. तो पर्यंत अजगराच्या धडावर डोके टेकून कुंभकर्णासारखे झोपायला काय हरकत आहे? संपूर्ण क्रांतीच्या घोषणा चालू असताना समाज मात्र शांतपणे कुंभकर्णासारखा झोपलेला आहे. आणि अशा अनेक क्रांत्या पचवून सुद्धा आपली सुस्ती न सोडणारा भारताचा राष्ट्रीय प्रवाह आहे. भगीरथ प्रयत्नाने एकदाची गंगा पृथ्वीवर येणे आणि तरीही कुंभकर्ण झोपलेला असणे; हे दोन्हीही पुराणांचे संदर्भ असणारे कल्पनागुच्छ

निधर्मी / ६९