पान:थेंब अत्तराचे (Themb Attarache).pdf/7

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१. पुन्हा नभाच्या लाल कडा


- बी. रघुनाथ

 'आलाप आणि विलाप' या छोट्याशा कवितासंग्रहानंतर पंधरा-सोळा वर्षानी के. बी. रघुनाथ यांचा हा दुसरा कवितासंग्रह प्रकाशित होत आहे. कल्पकतापूर्ण नाव, त्र्यांशीव्या पानापर्यंतची जुळणी आणि डॉ. ना. ग. जोशी यांची प्रस्तावना, हे सारे काम त्यांनीच तयार केलेले होते. पण प्रकाशनाचा योग मात्र दुर्दैवाने त्यांच्या हयातीत येऊ शकला नाही. अडचणींच्या सगळ्या कड्या तोडून आज हा संग्रह प्रकाशित होत आहे. ही खरोखरच आनंदाची गोष्ट आहे.

 'राजहंस' मासिकांत त्यांची पहिली कविता आली, तेव्हा कवीचे वय अवघे सतरा वर्षांचे होते. काव्याच्या प्रांतांत रविकिरण मंडळाचा बोलबाला होता. प्रतिष्ठानच्या पहिल्या आणि दुसऱ्या अंकांत त्यांच्या शेवटच्या कविता आल्या तेव्हा नवकाव्याला स्थिरता लाभलेली होती. या पाव शतकात मराठी कवी, काव्य आणि काव्यशास्त्र, साऱ्यांच्याच कक्षा रुंदावल्या. काव्यशास्त्रांत मूलभूत प्रश्नांची चर्चा अगत्याने होऊ लागली आणि काव्य पळत्या क्षणांची पाऊलवाट अमर करण्यासाठी धडपडू लागले. या संग्रहात त्यांचे समग्रकाव्य संग्रहित करण्यात आल्यामुळे कवीचा विकास न्याहळून पाहणे जसे सुलभ झाले आहे तसेच त्यांच्या बाबतीतली काही मते सुधारून घेणे आवश्यक झाले आहे. जे जे काही उत्कटतेने अनुभवले, मनाला बोचून गेले, ते सारे शब्दांकित करण्यासाठी कवी धडपडत असतो. नवे नवे विषय शोधण्याचा प्रयत्न आणि नव्या नव्या पातळीवरून तेच विषय हाताळण्याचा प्रयत्न या दोन मार्गांनी ही धडपड काव्यांत आढळून येते. कलासृष्टीच्या मायानगरीत अभिव्यक्तींच्या पर्ततेचे समाधान हा एक शाप असतो. ज्यांना हे असमाधानच नाही, त्यांना या क्षेत्रांत वाव नसतो. जे समाधान मानून घेतात ते घसरतात आणि ज्यांचे समाधान होते ते संपतात. असा येथला प्रकार आहे. अर्थातच बी. रघुनाथ यांच्या काव्याला हा बंदिस्तपणा शेवटपर्यंत आलेला नाही. त्याचा विकास दर

पुन्हा नभाच्या लाल कडा / ५