गोष्ट जाणवत असेल तर ती ही की, तो आपल्या समाजापासून तुटलेला आहे. आणि उरलेल्या समाजाशी मात्र जुटलेला नाही. आपण सगळीकडूनच तोडले जाऊन एकाकी पडलेलो आहोत याची उत्कट व्यथा अशा मंडळींना असते. शहाजिंदे यांचे दुःख तर याहीपेक्षा थोडेसे निराळे आहे. भारतात नानाविध आश्चर्ये आहेत यांपैकी एक आश्चर्य म्हणजे इतिहासपरंपरेच्या स्मृतींनी निर्माण केलेल्या पोटजाती हे आहे.
शहाजिंदे कान्होपात्रेच्या कुळातील मुसलमान आहेत. आपण मुसलमान आहोत हेही त्याला विसरता येणार नाही. वारकरी संप्रदायातील प्रसिद्ध संत कान्होपात्रा हिच्या कुळातील आपण आहोत हेही त्याला विसरता येणार नाही. वारकऱ्यांशी असणारा आपला संबंध, हिंदू चालीरीतींशी असणारा आपला संबंध त्याला टळणारा नाही. नव्या विचारांचे संस्कार जरी शहाजिंदेवर झालेले नसते तरी मुस्लिम समाजातील एक उपेक्षित दलितप्राय पोटजातीचा माणूस म्हणून त्याचे अस्तित्व उरले असते. मुस्लिम असून मुस्लिम समाजाला परका, मुस्लिम असल्यामुळे हिंदू समाजाला परका या दोन घटनांच्यामुळे भारतीय असून भारतीय म्हणून जगण्याची जिद्द असून सुद्धा भारतीयांना परका, अशा इच्छा नसताना लादलेल्या परकेपणाचे ओझे मिरविण्याची परंपरा-प्राप्त सक्ती झालेला हा एक कवी आहे. शहाजिंदेच्या रूपाने मराठी वाङ्मयात दलितप्राय पण संवेदनाक्षम मन असलेल्या एका मुस्लिम कवीचे अनुभव शब्दबद्ध होत आहेत. वाङ्मयाच्या समृद्धीच्या दृष्टीने मला ही गोष्ट स्वागतार्ह वाटते.
शहाजिंदेचे स्वत:चे मन परंपरावादी नाही पण ज्या जगात त्याला वावरायचे आहे त्या जगातील माणसांची मने परंपरावादी आहेत. भोवताली पसरलेल्या या सर्व परंपरावादाची विषण्ण करणारी नोंद घेणे या कवीला भाग आहे.
एका संध्याकाळी घराच्या उंबरठ्यावर आई बसलेली आहे. ही संध्याकाळ आणि हा उंबरठा या दोहोंनाही या कवितेत अनेक संदर्भ प्राप्त होतात. ही आई उंबरठ्यावरच आहे. ही मुसलमान असून मुसलमान नाही आणि तसे म्हटले तर मुसलमान आहेही.
ज्या परंपरांच्या गोष्टी ती सांगत आहे त्यांची आणि स्वत:च्याही जीवनाची संध्याकाळ या आईभोवती आहे. या आईला असे वाटते की तिच्या प्रिय मृताचा 'अकरावा दिवस' विधिवत साजरा झाला पाहिजे. दहावा अकरावा दिवस उत्तरक्रियेत महत्त्वाचा ठरतो. हिंदू परंपरेत ही स्त्री कान्होपात्रेच्या कुळातील आहे, ती अकरावा दिवस साजरा करण्याची कल्पना विसरू शकत नाही आणि उरलेल्यांशी सोयरसंबंध