पान:थेंब अत्तराचे (Themb Attarache).pdf/66

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सातव्या शतकातील अरबस्तान इथेच घोटाळत असते. या गटातील मंडळी मोठ्या श्रद्धेने महंमद पैगंबराचे चरित्र आणि इस्लाम या विषयी लिहीत असतात. या दोन गटांच्या बाहेर असणाऱ्या मुस्लिम लेखकांची संख्या बोटावर मोजण्याइतकी थोडी आहे. मराठीपुरता विचार करायचा तर हमीद दलवाई हे एक ठळक नाव आहे. हा जो मुस्लिम समाजातील लेखकांचा अतिशय छोटा गट, या गटात माझे मित्र शहाजिंदे एक विचारात घेण्याजोगे कवी म्हणून प्रवेश करीत आहेत; ही माझ्या मते स्वागतार्ह घटना आहे.

 शहाजिंदे हा कवी मुसलमान आहे याला वाङ्‍‍मयाच्या दृष्टीने काहीच महत्त्व नाही, हे मी जाणतो. वाङ्‍‍मयाच्या क्षेत्रात तुम्ही कोण्या जाती धर्माचे आहात हा प्रश्न फक्त एका कारणाने महत्त्वाचा ठरत असतो ते कारण म्हणजे या घटनेमुळे वाङ्‍‍मयात अभिव्यक्त झालेल्या अनुभवांना काही नवे परिमाण मिळालेले आहे काय? मला स्वत:ला असे वाटते की ज्या प्रकारचा एकटेपणा शहाजिंदे यांच्या कवितेत आहे त्या एकटेपणाचे एक कारण तो मुसलमान आहे हे आहे. मुस्लिम समाज एक चमत्कारिक मन घेऊन जीवन जगत असतो. आपल्याच मनाने निर्माण केलेल्या भ्रामक इतिहासात त्याचे मन दडलेले असते. त्याचा भारताच्या इतिहासाशी फक्त मुस्लिम राजांच्या इतिहासा-पुरता संबंध असतो. भारतीय समाजात मिसळण्यापेक्षा आपले निराळेपण टिकवून ठेवण्याकडे त्याचा ओढा 'असतो. आपल्याच धर्म परंपरेने निर्माण केलेल्या या कोंडीतून ज्यांच्या मनाची सुटका झालेली आहे त्यांची परिस्थिती तर याहून चमत्कारिक असते. शहाजिंदे सारखा कवी आपणा सगळ्यांनाच परका आणि तिन्हाईत वाटतो. आपण अनुबंध जोडण्यास तयार आहोत पण भोवतालचा समाज ते अनुबंध स्वीकारण्यास मात्र तयार नाही. या चमत्कारिक बाधेमुळे उद्विग्न आणि एकटा पडलेला असतो. या विशिष्ट एकटेपणामुळे निर्माण झालेल्या उद्विग्नतेची भावोत्कट चित्रे या संग्रहात जागोजाग विखुरलेली आढळतात.

 शहाजिंदे मुसलमान असल्यामुळे तो सगळ्या बिगर मुसलमानांना परका वाटणार हे अगदी उघड आहे. तो भारतीय म्हणून हिंदूच्यामध्ये मिसळू शकतो, धर्मातीत म्हणून हिंदूच्यामध्ये मिसळू शकतो. पण तो जरी मिसळण्यास तयार असला तरी हिंदु समाज त्याला आपल्यात फारसा मिसळ देणार नाही. हिंदूंना 'सेक्युलर हिन्दू विषयी' जितका विश्वास वाटतो तसा मुसलमानांच्या विषयी वाटणे कठीण जाईल.

 धर्मांची कोंडी फोडून बाहेर आलेल्या मुसलमानाला जर तीव्रपणे कोठली

६४ / थेंब अत्तराचे