Jump to content

पान:थेंब अत्तराचे (Themb Attarache).pdf/65

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९. निधर्मी


- फ. म. शहाजिंदे

 माझे मित्र प्रा. फ. म. शहाजिंदे यांच्या 'निधर्मी' या कविता संग्रहाला प्रस्तावना लिहिताना माझे मन एका विशेष उत्साहाने भरून आलेले आहे. या विशेष उत्साहाचे कारण वाङमयीन नसून अवाङमयीन आहे. मी स्वत: असे मानतो की अवाङ्‍‍मयीन बाबी सुद्धा जर वाङ्‍‍मयावर प्रभाव टाकू लागल्या तर वाङ्‍‍मयाच्या अभ्यासात महत्त्वाच्या ठरतात. फकीर महेबूब शहाजिंदे हा एक मुसलमान कवी आहे. सामान्यपणे मराठीत मुस्लिम लेखकांनी फारसे काही लिहिलेले आढळत नाही. इतर भारतीय भाषांची परिस्थिती नेमकी काय आहे? याविषयी अंदाजाने काही तरी बोलणे बरोबर ठरणार नाही. पण मराठी पुरते मुसलमान लेखकाचे चित्र मोठे चमत्कारिक दिसते, याची नोंद केलीच पाहिजे. माझे मित्र डॉ. रा. चिं. ढेरे यांनी 'मुसलमान मराठी संतकवी' या नावाचे एक पुस्तकच लिहिलेले आहे. या पुस्तकात प्राचीन मराठी वाङ्‍‍मयातील अनेक मुसलमान मराठी कवींचा परिचय करून देण्यात आलेला आहे. डॉ. ढेरे यांनी - परिचय करून दिलेले सर्व मुसलमान कवी मुस्लिम समाजात जन्माला आले, | इतक्या अर्थानेच मुसलमान आहेत. त्यांची भाषा, त्यांचे विचार आणि वाङ्‍‍मयातून व्यक्त होणारी त्यांची संस्कृती या साऱ्यांच्यासह हे सारे लिखाण अगदी हिंदू आहे. शेख महंमदसारखा कवी, 'योगसंग्राम' सारखा ग्रंथ लिहितो. या ग्रंथात त्याचे नाव शेख महंमद सोडले तर तो मुसलमान असल्याचा कोणताही पत्ता लागत नाही. काही मुसलमान लेखक या प्रकारचे आहेत. आधुनिक काळातले या गटातील चांगले उदाहरण द्यायचे तर शाहीर अमर शेखांचे सांगता येईल.

 मुस्लिम लेखकांचा अजून एक दुसरा गट आहे. या मंडळींचा महाराष्ट्राशी संबंध फक्त ते मराठीतून लिहितात इतकाच असतो. आपण भारतात आहोत याचेही भान त्यांना नसते. कोणत्याही ऐतिहासिक अगर चिकित्सक दृष्टीचा संबंध येऊ न देता त्यांचे श्रद्धाळू मन, इस्लाम धर्म, महंमद पैगंबर आणि

निधर्मी / ६३