हुताम्यांच्या बलिदानाचा आधार असतो. मोठ्या प्रमाणात माणसे स्वार्थी आणि भ्रष्ट दिसतात. हे खरे आहे पण याही जगात सर्वस्वाचे बलिदान करणारा वेडा फकीर अधून-मधून येतो. माणूस स्वार्थाबाहेर जाऊ शकतो, तो उदात्त होऊ शकतो ही कवीची खात्री आहे आणि अजूनही शेतकऱ्यावर त्याचा विश्वास आहे. या घटनेच्यामुळेच आशावादाला जागा असते. निर्मिती व तिचे स्वागत शक्य असते. म्हणूनच निसर्ग सौंदर्याला अर्थ असतो. या निसर्ग सौंदर्याची काही लोभनीय चित्रे या संग्रहात पाणवठा, धरतीच्या ओठावर इत्यादी कवितांतून विखुरलेली आहेत. बारकाईने पाहिले तर असे दिसेल की कवीला अजून प्रेमात, प्रेयसीत अर्थ वाटतो. शेती व शेतकरी यात अर्थ वाटतो म्हणूनच त्याला सौंदर्यातही अर्थ वाटतो.
कोणत्याही प्रकारचा सोस नसलेली अशी ही कविता आहे. अनुभव घेणे अगर मांडणे यातील तिरकसपणा, मुद्दामच शब्दांचा नादी लागणे अगर शब्द उधळणे, कल्पनाविलासाची गरज असो की नसो त्याची कास धरणे असे जे वेगवेगळे सोस कवी मनाला असतात तसा सोस असणारी ही धीट कविता आहे. ही अशी ग्रामीण स्त्रीसारखी, कुणी पाहते आहे याचा संकोच नसणारी पण सर्वांनी पाहावेच यासाठी नटण्याचीही हौस नसणारी स्वाभाविक वळणाची कविता आहे. म्हणून या कवितेमागे असणारे जे कविमन आहे त्याचाच मी विचार केला. कवी ओळखीचा, कविमनही ओळखीचे त्यामुळे, कवितेत दिसणारा कवी आणि बाहेर वावरणारा माणूस सतत जाणवतच होता. अमृत देशमुखांना ओळखणारे लोक नेहमीच असे म्हणतील की, जो कवी आहे तसाच माणूस आहे आणि जो नित्य परिचित माणूस आहे तोच कवी म्हणून भेटतो आहे.
मी आरंभीच नोंदविले आहे की, प्रा. देशमुख माझे जुने मित्र. ते शिक्षक व प्राध्यापक म्हणून सर्वांच्या समोर होते. आता कवी म्हणून, शारदेच्या दरबाराचे वारकरी म्हणून ते नव्या प्रवासास शिदोरीसह येत आहेत. एक जुना मित्र म्हणून अशा क्षणी शुभेच्छा देणे माझे कर्तव्यच आहे. प्रस्तावना हा शुभेच्छेचा एक प्रकार आहे अशी माझी धारणा आहे.