पान:थेंब अत्तराचे (Themb Attarache).pdf/63

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आपण जीवनात जे गंभीर मानतो त्याचा व्यवहारात होणारा पराभव काही कडवटपणा मनात निर्माण करतोच. तुच्छतेने हसून हा विषय सोडून देता येत नाही. संताप येताच हे सारे एकदा जाळून मोडून फेकून द्यावे असे वाटतेच. या मनाच्या सर्व तऱ्हा देशमुखांच्या कवितेत मधून मधून येतात. तरीही खरोखरी त्यांचे मन हताश, विफल असे झालेले नाही. या मनाचा आशावाद चिवट आहे. तो थोडासा कोमेजला तरी सुकत नाही. पुन्हा टवटवीत होतो. दारिद्र्य असले तरी ते जीवनातील सुख संपवीत नाही. तान्या मुलाला पत्थराची उशी व घोंगडीचे अंथरूण इतकेच जरी उपलब्ध असले तरी त्यामुळे माया बदलत नाही. आईचे प्रेम तसेच गाढ आणि उत्कट राहते. स्वत:च्या जीवनात कवीला दु:खच गाण्याची ताकद झाल्याचा व प्रत्येक आपत्ती साहसाची जननी ठरल्याचा प्रत्यय येतात. निराशेच्या वादळात आशेची ज्योत पेटतेच असाही त्याचा विश्वास आहे. नव्या जोशाने नवी स्वप्ने पाहणे हा छंद कवीच्या मनाचाच भाग आहे. त्यातून तो सुटू शकत नाही. दुरात्म्याच्या नाशाचे स्वप्न तो पाहतोच. त्याच्या देहाच्या चिंध्या झालेल्या त्याला दिसतात. दुरात्मे स्वप्नातच ठार होतात. व्यवहारामध्ये अधून मधून अल्पकाळ दुष्टांचा पराभव होतो. पुन्हा पक्ष बदलून तीच माणसे जोमात वावरताना दिसतात. तरी सद्धा दुष्टांच्या नाशाचे स्वप्न पाहिलेच पाहिजे. यामुळेही अमृत देशमुखाचे मन कधी खरोखरी विफल होत नाही.

 जगाच्या या बाजारात सगळ्याच गोष्टी मोडीत निघालेल्या असताना माणूस आपल्या मनाची उभारी व आशावाद कसा कायम टिकवून ठेवतो? इतर कुणाचे काहीही असो; पण या प्रश्नावर कवीचे उत्तर अगदी स्पष्ट आहे. आपल्या वैयक्तिक जीवनात कवीला जो प्रीतीचा लाभ झाला त्यामुळे हताश व विफल होणे त्याला शक्य नाही. हे या प्रश्नाचे एक खरे उत्तर आहे. माझ्या संसारात जरी निराश उणेपणाचा तराणा चालू असला, तराण्यातील अर्थहीन पदांच्या पुनरावृत्तीप्रमाणेच वेगाने पण अर्थहीन जीवन चालू असले तरी त्याला एक अपवाद आहे. ही अपवादभूत जागा म्हणजे तू. तिच्यावर आसावलेला जीव लगेच गोड गाणे म्हणू लागतो. भोवती कितीही निराशा आणि काळोखाचे साम्राज्य असो तरी तिच्यामुळे जगण्याची इच्छा राहतेच. दुःखाच्या उन्हातही चांदणे असतेच. अजून एका कवितेत कवी म्हणतो की या डोळ्यांत मधुर स्वप्नांची खैरात आहे. अजून एका कवितेत तो स्वप्नांच्या गोपुरात जातो. वैयक्तिक जीवनात जसा प्रीतीचा आधार आहे तसा सार्वजनिक जीवनात

तराणा / ६१