पान:थेंब अत्तराचे (Themb Attarache).pdf/62

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 आपण उगीचच स्वत:ला फार मोठे समजत असतो. या आत्मवंचनेचा फुगा 'माझी किंमत' या कवितेत हळूच देशमुखांनी फोडला आहे. जे जग तुमची किंमत करणार ते आपल्या गरजा आणि अपेक्षांनीच करणार. घरी झोडलोट करणारी मजुरीणही आपल्या प्रमाणेच माणूस असते. आपल्या स्वत: विषयीच्या मोठेपणाच्या व तिच्या विषयीच्या छोटेपणाच्या हजार समजुती असतात. पण तिचेही एक गणित आहे. तिला मिळणारा महिना सात रुपये तिच्या लेखी तुमची किंमत सात रुपये इतकीच असणार. धोबी पैसे मिळतील की नाही या शंकेमुळे तुम्हाला मळका कपडा मानणार, कॅन्टीनवाल्यासाठी तुम्ही म्हणजे वसूल न होणारी उधारी. या सर्व किंमती ठरविणाऱ्यांमध्ये सर्वांत अधिक किंमत पत्नीला वाटते. तिच्यासाठी नवरा लाख मोलाचा जिन्नस आहे आणि वेळेवर पैसे नसले तर नवरा कवडी मोलाचा आहे. किंमत ठरविणाऱ्यांमध्ये दोन्ही टोके गाठणारे माणूस आपलेच असावे ही गंमत म्हणावी की नशिबाने साधलेले वैर म्हणावे? की आपलेही उत्तर दरवेळी सोयीने निरनिराळे येणार?

 सार्वजनिक जीवनात आपण कार्यक्रमाधिष्ठित संघटित राजकारण कधी उभे करू शकलो नाही. संघटना नाही म्हणून माणसे भाड्याने घेणे आणि वातावरण निर्माण करणे व कार्यक्रमाचा आधार नाही म्हणून धर्म व जातीचा आधार घेणे हे उद्योग सुरू होण्याचे कारणच असे असते. यालाच आपण भ्रष्टाचाराची वाढ असे म्हणतो. सार्वजनिक जीवनात हा एक बळकट प्रश्न होऊन बसलेला आहे आणि जे या प्रश्नाला काही उत्तर देतील अशी आशा यंदा धरायची ते पुढचे वर्षी भ्रष्टाचाराचा नित्य भाग झालेले दिसत आहेत. देशमुखांच्या अनेक कवितांना ही पार्श्वभूमी आहे. 'नेता' कवितेत ते म्हणतात की, निवडणुकीत नम्र सेवक असणारा हा नेता. निवडणूक नसली की याला माज चढतो. या यादीत पांढरा पोषाख व उलटे काळीज यांचाही उल्लेख आलेला आहे. भारतीय स्वातंत्र्यानंतर वर्षानुवर्षे काँग्रेस हा पक्ष सत्ताधारी राहिला त्यामुळे पांढरी स्वच्छ खादी हे नेत्याचे प्रमुख वैशिष्ट्य राहिले. आता असे दिसत आहे की पांढरा पोषाख आणि उलटे काळीज याचा संबंध सर्व सत्ताधारी व सत्ता पिपासू राजकारणाशी कायम असतो. एका विशिष्ट पक्षाशी त्याचा काही संबंध नाही.

 या सार्वजनिक वातावरणाचेच पडसाद ‘भजनी रंगलो', 'हितासाठी', जनाचे 'श्लोक' इ. कवितांत उमटतात. यापैकी जनाचे श्लोक विशेष रंगतदार उतरलेले आहेत. पण नेहमीच कवी उपहासाच्या मर्यादेवर थांबू शकत नाही.

६० / थेंब अत्तराचे