चांगली माणसे उदयाला आली त्यांचे चांगूलपण केवळ ती परंपराजन्य मने आहेत म्हणून कवी नाकारणार नाही. यासाठी 'माझा बाप' सारखी कविता मुद्दाम पाहण्याजोगी आहे. कवीच्या दृष्टीने माझा बाप हा केवळ माझा बाप आहे ही बाब महत्त्वाची नाही. हा बाप भजनांत बेहोष होऊन नाचणारा आणि भक्तीत चिंब होऊन भिजणारा आहे. पण हा केवळ भजनाचा आनंद नाही. समोरचा भिकारी पोटभर जेवला या आनंदात आपले बुरुजावरले घर पडके आहे हा विषाद होणे हेही येथे आहे. फकिराला धान्य पशाने वाढू नये, सुपाने वाढावे असे त्याचे मत आहे. तो दान म्हणून दुभती गाय देतो आणि सून म्हणून हुतात्म्याची मुलगी पत्करतो. देशमुखी आहे पण जुन्या वैभवाला उतरती कळा लागली आहे, पण या उतरत्या वैभवामुळे मनाचा मोठेपणा वाढला आहे. मनाचा समजूतदारपणा व समृद्धी वाढली आहे. खरे म्हणजे आपला आनंद प्राप्त परिस्थितीत निर्माण करणारी ही एक मनोवृत्ती आहे. समाधानी मनाने जगणे व त्याच समाधानाने मरणे हा एक योग आहे.
याच परंपरेकडे तटस्थ मिस्किलपणे पाहणे देशमुखांना जमते. त्यादृष्टीने त्यांची 'वाढदिवस' ही कविता पाहण्याजोगी आहे. पुन्हा ते ग्रामीण जग व तेथील श्रद्धा इथे आहेतच. पण आता कवी त्या जगाकडे तटस्थ व मिस्किलपणे पाहतो आहे. आपल्या लाडक्या लेकाविषयी आईचे मत असे आहे की, बाळा जेव्हा तू पोटात आलास तेव्हा सारा गाव पटकीच्या रोगाने त्रस्त झाला होता, गावे ओस पडली होती व माणसे रानावनात राहू लागली होती आणि तू जन्माला आलास तेव्हा सकाळ झाली होती, म्हशीने पहिला पोवटा टाकला होता. त जन्माला येऊन रडलास तेव्हा तो आवाज ऐकून बापाने "अपेशी कारटं" म्हणन स्वागत केले होते. खरे म्हणजे माणसाच्या हातात यापैकी काहीच नाही. पण वाढदिवस म्हटला की प्लेग, म्हशीचा पोवटा आणि बापाचे उद्गारअपेशी कारटं हे आठवतात, या आठवणी कवी सांगतो त्यात मिस्किलपणा आहे, इतराचे वाढदिवस आनंद, फुले, जेवण, मिठाईशी जोडलेले तर माझा असा खेड्यातील यातनेशी आहे असे त्याला म्हणायचे आहे. आपण अपेशी कारटं आहोत असे त्याला वाटत नाही. त्याला वाटते ती काळ आणि माणसाचा जन्म यांचा सांधा जोडणाऱ्या माणसाच्या मनाची गंमत. परंपरा हेच त्या मनाचे जीवनाला घेरून टाकणारे प्रमुख वास्तव आहे. त्याचे कधी हळव्या प्रेमाने, कधी मिस्किलपणाने कधी, वैताग संतापाने कवी दर्शन घेतो हे पाहण्याचे वैविध्य हे अमृत देशमुखांच्या कवितेतील एक लक्षणीय वैशिष्ट्य ठरलेले आहे.