- अमृत देशमुख
माझे जुने मित्र प्रा. अमृत देशमुख यांचा कवितासंग्रह प्रकाशित होतो आहे. त्याला मी प्रस्तावना लिहिलीच पाहिजे. ज्या नांदेडकरांना हा कवितासंग्रह अर्पण करण्यात आला आहे तेही माझे जुने मित्र. पाहता पाहता या संग्रहामुळे मी माझ्या फार जुन्या आणि हळव्या काळाजवळ जाऊन पोचतो आहे. या नांदेड नगरीत मी जेव्हा आलो त्यावेळी एक प्रकारे शून्य होऊनच मी आलो होतो. शिक्षण संपल्यात जमा होते. आपण फक्त मॅट्रिक पास आणि यापुढे शिकणे जमणार नाही असे गणित मनात पक्के होते. शिक्षक म्हणून ज्या शाळेत मी लागलो होतो तेथून नांदेडकर नुकतेच बाहेर पडलेले होते. राजकारण संपलेले होते. लग्न नुकतेच झाले होते. संसार मांडण्यास आरंभ झाला होता. मी नांदेडमध्ये आलो आणि पाहता पाहता माझ्या भोवती मित्रांचे एक वर्तुळ निर्माण झाले त्यात न. दे. नांदेडकर होते. मी बोलका आणि आक्रमक. नांदेडच्या वातावरणाने नव्या जोमाने उल्लसित झालेलो. पुष्कळसा भाबडा. नांदेडकर खेळकर, विनोदी पण अतिशय समजूतदार. डॉ. बार्लिंगे हे प्राचार्य पदावर असूनही पोरासोरांत मिसळणारे आणि त्याच वर्तुळात फारसे न बोलता असणारे, लाजरेबुजरे, माझ्या सारखेच एक मॅट्रिक पास अमृत देशमुख. पाहता पाहता काळ वाहून गेला आहे. बार्लिंगे आता निवृत्तीच्या उंबरठ्यावर पुण्यात आहेत. नांदेडकर प्राचार्य म्हणून हैद्राबादला आहेत. अमृत देशमुख प्राध्यापक म्हणून स्थिरावले आहेत. पण हा संग्रह हाती घेतला आणि मी चटकन त्या जुन्या काळात जाऊन पोचलो. तात्त्विक वादविवाद करताना शिवीगाळीपर्यंत पोचणारा मी प्रस्तावना लेखक, मुद्दा, आग्रह आणि हसणे न सोडता बोलणारे नांदेडकर यांना पुस्तक समर्पण आणि ही भांडणे विकोपास न जाता जेवण्याच्या ताटावर मिटतात हे पाहून हळूच हसणारे कवी अमृत देशमुख. आता अमृत देशमुखही ते लाजरे बुजरे राहिलेले नाहीत, शिक्षकाच्या