शांततेचा पुरस्कार ही राजकारणातील एक फॅशन झालेली आहे. त्या त्या देशातील जनतेला क्रांती करता येऊ नये म्हणून शेजारच्या राष्ट्रांनी राज्याला फौजा देऊन क्रांती चुरडून टाकली आहे व याचे वर्णन शांतता असे केले आहे. युरोपातील राष्ट्रांनी आशिया, आफ्रिका, गुलाम केला व तोही शांतता टिकवण्यासाठी, निर्माण करण्यासाठी. पहिल्या, दुसऱ्या महायुद्धात हा शांततेचा जप चालूच होता. आजही रशिया व अमेरिका प्रचंड सेनादले उभारतात, विध्वंसक अण्वस्त्रांनी सज्ज होतात आणि जगात शांतता नांदावी यासाठी जगभर लहान मोठ्या चकमकी चालू असतात. बलवंताचा स्वार्थ सोयीस्कर भाषा वापरतो त्यापैकी शांतता हा एक शब्द आहे. म्हणून शांततेच्या नावाने युद्धे चालू असतात.
मोडक्या-तोडक्या लांबीच्या चार सहा ओळी. त्या सुद्धा गंमत म्हणून लिहायच्या. परिहास, करमणूक व मौज म्हणून पाडगांवकरांच्या वात्रटिकांच्या प्रमाणे वाचायच्या, हा शरद कट्टींचा हेतू. मुद्दाम त्यांनी कुटुंबनियोजनाच्या काळात संग्रहाचे नाव चौथे अपत्य असे ठेवलेले आहे. त्यांनी सहज गंमत म्हणून प्रस्तावना लिहा म्हटले व मी एखाद्या बावळटासारखा प्रत्येक मुद्द्याचे गंभीर विवेचन करतो आहे. हाच खरे म्हटले तर एक विनोद मानता येईल. पण गंभीर प्रस्तावना हा हसू आणणारा विनोद नसतो, हा हास्यास्पद ठरणारा प्रयत्न असतो. म्हणून कवी व वाचक यांच्या ओठांतील हसू खो खो करून बाहेर फुटण्याच्या आत थांबले पाहिजे.