Jump to content

पान:थेंब अत्तराचे (Themb Attarache).pdf/56

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

असले तरी शौर्यधैर्याचा उगम हत्यारातून होत नसतो, तो मनातून होतो. हाच प्रकार उंदराचा आहे. हा अतिशय क्षुद्र प्राणी प्रचंड प्रमाणात धान्याचा नाश करीत असतो आणि उंदीर मारण्याचे सर्व उपाय आजवर थकलेले आहेत. त्यामुळे जाहिरात देऊन मारेकरी बोलावणे भाग आहे. जर निसर्गाच्या क्रमात आपण हस्तक्षेप करणार असू तर तोल बिघडतो. असा बिघडलेला तोल जर माणूस जिद्दीने सावरणार नसेल तर पिढ्यांचे नुकसान होते. संख्येच्या शक्तीच्या जोरावर व विध्वंसशक्तीच्या जोरावर उंदरांनी माणसांना जणू एक आव्हानच दिलेले आहे. चीनमध्ये उंदीर मारण्याची मोहीम काढावी लागली होती. तेव्हा विनोद आहेच पण गंभीर सत्यही आहेच की, मारेकरी पाहिजेत या ठिकाणी 'मारेकरी' शब्द विचारात घेण्याजोगा आहे.

 खडाष्टक नाटकाचे कर्ते शं. प. जोशी यांनी सहगमन, उत्तरक्रिया इत्यादी शब्द असेच वापरले आहेत. भाषेतील काही शब्दांचा अर्थ संकोच होतो. मारण्यासाठी पाठविलेले, मारणारे, ते मारेकरी हा या शब्दाचा योगिक अर्थ आहे. पण माणूस मारण्यासाठी योजिलेले असा त्याचा अर्थसंकोच झालेला आहे. अर्थसंकोच झालेला शब्द मूळ अर्थाने वापरल्याबरोबर चमत्कृती व विनोद झालेला आहे. विरोधकांनी एकमेकांना विरोध केल्यामुळे आम्ही निवडून आलो ही एक राजकीय कोपरखळी आहे. ज्या लोकशाहीत दोन प्रबल पक्ष एकमेकांच्या समोर उभे नसतात, त्या लोकशाहीत अनेक ठिकाणी मते विभागली गेली याचा एका मोठ्या पक्षाला फायदा होणे अपरिहार्य असते. भारतात असा फायदा काँग्रेस पक्षाला होतो. जगभर जिथे लोकशाही आहे तिथे कमी-जास्त प्रमाणात हा प्रकार होतच असतो. विरोधकांत ३५ टक्केवाला एक आणि २५ टक्केवाला दुसरा अशी विभागणी आली की ४० टक्के मते असणारा प्रचंड बहमताने निवडून येतोच. या प्रश्नांचे उत्तर दोन प्रबळ पक्ष निर्माण होणे अगर करणे हे असते. सत्ताधारी पक्ष आपले अस्तित्व टिकविण्यासाठी सातत्याने विरोधी पक्ष अनेक असावे व ते दुबळे असावे याचा प्रयत्न करीत असतो. कट्टींनी प्राय: राजकीय टीका केलेली नाही पण कुठे कुठे ती केली आहे व ती मार्मिकही आहे.

 वाचक, साहेब, वाटोळे, प्रसिद्धिपराङ्मुख, एक मिनिट हैं, या सारख्या कवितांच्या मधून असाच परिहास पसरलेला दिसेल. मधून मधून हा परिहास क्षणभर गंभीरही करून टाकतो. त्या दृष्टीने शांततेसाठी युद्ध ही कल्पना महत्त्वाची आहे. व्हिएन्ना काँग्रेसपासून म्हणजे नेपोलियनच्या पाडावापासून

५४ / थेंब अत्तराचे