Jump to content

पान:थेंब अत्तराचे (Themb Attarache).pdf/55

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

देवालयातून अगर एखाद्या सभा-संमेलनातून चपला चोरीला जाणे चांगले नव्हे पण ते अपरिहार्य म्हणून गृहीत धरतो. माणसाने चोर असावे असे कुणीच म्हणणार नाही. पण काही माणसे चोर असतात हे आपण गृहीत धरून चालतो. ज्या ठिकाणी कुणी यावे याला धरबंद नाही तिथे काही चोर येणारच आणि चोऱ्या करणारच. त्यातच चप्पल ही एक नेहमी चोरली जाणारी वस्तू आहे. पण लग्न समारंभात हे व्हावे काय? नवरा अगर नवरी यांचे इष्टमित्र, नातेवाईकच तिथे असतात. त्याठिकाणी चप्पल चोरीला जावी याचा अर्थ हा की चोरीचा धंदा करणाऱ्याच्या खेरीज शिष्ट समाजात हौस म्हणून चोऱ्या करणारे आपले काही मित्र आहेत. कवीला नेमका हा मुद्दा सांगायचा आहे असे नाही. तो याहूनही जास्त खोलात उतरू इच्छितो. आपल्या नीतिअनीतीच्या कल्पना आपल्या स्वार्थाशी निगडित आहेत. एक गोष्ट वाईट का, तर ती मला करता आली नाही अगर मला करणे जमले नाही म्हणून. असे आपण स्पष्टपणे म्हणत नाही पण मनाच्या एका कोपऱ्यात स्वार्थाची ही जाणीव नीतीच्या विचारांना चिकटलेली असतेच. चपला चोरल्या गेल्या हे फार वाईट कारण त्यांतली एकही मला मिळाली नाही, असा हा मुद्दा आहे. ज्यांनी चपला चोरल्या ते तर चोर होतेच, पण ज्यांनी चपला चोरल्या नाहीत, फक्त हळहळ व्यक्त केली तेही मनातून इच्छा असणारे चोरच होते, असे कवीला म्हणायचे आहे. आपल्या सोयीनुसार नीती कल्पनांची आराधना करावयाची हा जर माणसाचा उद्योग असेल आणि तो जर तसा आहे तर मग लग्न समारंभातूनच काय पण आपल्या स्वत:च्या घरातूनही भेटीसाठी येणारे मित्र आपल्या चपला चोरतील ही शक्यता गृहीतच धरली पाहिजे. पाहता पाहता कवी मानवी मनातील सनातन अशा झगड्याकडे आपणाला घेऊन जातो. चांगले वागा कारण ते फायद्याचे आहे. असे माणूस जेव्हा मनातून मान्य करतो तेव्हा तो चांगलेपण हे फायद्याचे साधनच समजत नसतो काय?

 हातात बंदूक असणाऱ्या पोलिसास संरक्षण पाहिजे. ही अशीच कल्पना आहे. तुकाराम महाराजांनी एका झुंजाराचे वर्णन केले आहे.

  ढाले तलवारी गुंतले हे हात।

  म्हणे झुंजार झुंजो कैसा॥

 दोन्ही हात गुंतलेले. एक ढालीत. दुसरा तलवारीत असे दोन्ही हात गुंतल्यावर 'मी लढू कसा' असे तो योद्धा विचारतो आहे. हातात बंदूक असणारा पोलिस दुसरे काही मागत नाही. हत्यारांचे महत्त्व कितीही मोठे

चौथे अपत्य / ५३