पान:थेंब अत्तराचे (Themb Attarache).pdf/54

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जाणवणारी विसंगती हे हास्याचे अजून एक कारण असते. मी स्वत: कुटुंबनियोजनाचा पुरस्कर्ता आहे. पण तरीही ज्या सवंग पद्धतीने हा प्रश्न मांडलेला असतो तो मलाही हास्यास्पद वाटतोच.

 माझा मुद्दा परिहासाचा आहे. कट्टी अल्पबचत व कुटुंबनियोजन याचे विरोधक आहेत का? तसे मानण्याचे कारण नाही. उलट ते पुरस्कर्ते आहेत. म्हणून या कवितेचा सूर उपहास, उपरोधाचा नाही. ती एक गंमत आहे. मौज म्हणून केलेली थट्टा आहे. कट्टींच्या बहुतेक सर्व कवितांचा सूर हा असा परिहासाचा आहे. परिहासासाठी शाब्दिक कोट्यांचा फार उपयोग होतो. कुठे मुख्यार्थाने घ्यावयाचे शब्द लाक्षणिक अर्थाने वापरले की विनोद होतो. एका राजकीय नेत्याची गोष्ट अशी सांगतात की, भुकेची वेळ होती म्हणून नेत्याला त्याच्या मित्राने विचारले, "काही खाणार का?' तर नेते म्हणाले, “खाईन. पण कबूल करणार नाही." इथे 'खाणे' शब्दाचा मुख्यार्थ व लक्ष्यार्थ यांत झालेला घोटाळा स्पष्ट आहे. कट्टींच्या काही कवितांमध्ये असणाऱ्या कोट्यांचा आधार हा घोटाळा आहे. ताजमहाल कुणी बांधला? या प्रश्नात बांधणे हा शब्द लक्षार्थाने आहे. पैसा पुरविणे, बांधून घेणे हा अर्थ इथे अभिप्रेत आहे. या अभिप्रेत अर्थाने आपण शहाजहानने ताजमहाल बांधला असे म्हणतो. कट्टींनी बांधणे हा शब्द मुख्यार्थाने घेऊन गवंडी व कारागीर यांना ताजमहालचे श्रेय दिलेले आहे. बांधणे या शब्दात अजूनही अर्थाच्या काही छटा आहेत. रचना करणे या अर्थाने नेहरूंनी भारत बांधला; बांधून ठेवून दास करणे या अर्थाने भांडवलशाहीनेही भारत बांधलाच आहे. शब्दाच्यामध्ये असणाऱ्या या अर्थाच्या छटा म्हणजे भाषेची समृद्धी व शोभा असते. 'खोऱ्याने ओढणे' हा वाक्प्रचार असाच आहे. लक्षार्थाने पैसा खोऱ्याने ओढतात. वाच्यार्थाने दाढी करताना खोरे ओढावे लागते. साधना साध-ना ही अशीच कोटी आहे. "मी पुन्हा चोरी करणार नाही, केल्यास शिक्षा व्हावी' या वाक्यात विराम कुठे आहे? 'करणार' नंतर की 'नाही' नंतर? विराम बदलला की अर्थ बदलतो. आघात बदलला की अर्थ बदलतो. कट्टींना या विशेषांची उचित योजना करण्याचे कौशल्य दाखवणेच भाग आहे.

 शाब्दिक कोट्या आणि कल्पकता या आधारे निर्माण होणाऱ्या विनोदाच्या मानाने विसंगतीच्या जाणिवेतून निर्माण होणारा विनोद थोडासा गंभीर व अंतर्मुख करणारा असा असतो. एका लग्न समारंभात कित्येक चपला चोरीला गेल्या. लग्न समारंभात चपला चोरीला जाणे हे फार वाईट. यात्रे-जत्रेतून,

५२ / थेंब अत्तराचे