मला स्वत:ला माणूस हसतो का हा प्रश्नच चुकीचा वाटतो. माणूस नुसता हसत नाही, माणूस रडतोसुद्धा, तो दु:खीही होतो. माणूस दु:खी का होतो? आपण कितीही आणि कोणतीही कारणे द्या, ती कारणे सार्वत्रिकरीत्या लागू पडत नाहीत असे आढळून येईल. मानवी जीवनात भावभावना आहेत. त्या प्रसंगाने उत्कटतेने व्यक्त होतात. पण त्यांची कारणे त्या त्या व्यक्तीपुरती, प्रसंगापुरती असतात. सार्वत्रिक नसतात. अशावेळी भावना निर्माणच का होतात हा प्रश्नच गैर आहे. खरा प्रश्न भावना निर्माण का होतात असा नसून भावनांचा उदय मान्य करणे व त्या भावना ललित साहित्यात कलात्मकता रूप केव्हा घेतात हे सांगण्याचा प्रयत्न करणे हा आहे. वाङ्मय समीक्षेची कक्षा इतकीच आहे. माणूस का रडतो? रडणे म्हणजे काय? याची चर्चा करण्यात वेळ घालविण्यापेक्षा रडणे कलात्मक केव्हा होते हा प्रश्न समीक्षेने सोडविला पाहिजे. हास्यालाही हाच नियम लागू आहे.
हसण्याची प्रवृत्ती हे माणसाचे खास वैशिष्ट्य आहे. खेळण्याची प्रवृत्ती प्राणीसृष्टीतून वारसा हक्काने येते. मूलभूत प्रेरणा अशा वारसा हक्काने येतात. पण शोक प्राणीसृष्ठीत नाही. दु:ख आहे, वेदना आहे, आक्रोश आहे पण तो प्रसंगापुरता असतो. शोकाचे स्वरूप तुलनेने स्थायी असते म्हणून अनेक मानसशास्त्रज्ञ शोक ही सहज प्रेरणा मानत नाहीत. हास्य तर प्राणीसृष्टीत नाहीच. माणसाने सहज प्रेरणांच्या इतक्या सार्वत्रिक व प्रबल अशा ज्या भावभावना आपल्या सांस्कृतिक व्यवहारातून सिद्ध केलेल्या आहेत त्यांपैकी हास्य ही एक आहे. माणसाच्या अनेक व्याख्यांच्यापैकी 'हसणारा प्राणी' ही एक व्याख्याच आहे. माणसाला हसावे वाटते. काहींची हसण्याची इच्छा इतरांच्यापेक्षा प्रबल असेल पण बाकीच्याही सर्वांना हसावे वाटतेच. प्रत्येक रडणे हा वाङ्मयाचा भाग आहे असे कुणी म्हणणार नाही. हाच प्रकार हसण्याला लागू आहे. हास्य कलेच्या पातळीवर केव्हा जाते हा फारसा चर्चिला न जाणारा, उत्तर देण्यास कठीण असणारा पण महत्त्वाचा प्रश्न आहे.
माणूस शतकानुशतके हसत आला. पण हसण्याला प्रतिष्ठा देण्याची इच्छा मात्र त्याला लौकर निर्माण झाली नाही. आजही हसण्याला प्रतिष्ठा देण्यात आपण टाळाटाळ करतोच. हसल्याविना राहवत नाही आणि असे हसणे बरे नाही या दोन जाणिवांची रस्सीखेच मानवी मनात नेहमी चाललेली असते. भारतीय संस्कृतीत अतिशय प्राचीन काळापासून हसण्याची इच्छा वाङ्मयात प्रतिबिम्बित झालेली दाखवता येते. ऋग्वेदातील मंडकसक्त हे याचे