पान:थेंब अत्तराचे (Themb Attarache).pdf/5

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्तावना प्रस्तुत संग्रहात चौदा कवितासंग्रहांच्या प्रस्तावना, दोन कवितासंग्रहाची परीक्षणे आणि एक कवितेसंबंधी विवेचन करणारे असे सतरा लेख आहेत. ज्यांच्या कवितासंग्रहांना कुरुंदकर गुरुजींनी प्रस्तावना लिहिल्या त्यांपैकी काहींनी कवितालेखन बंद केले आहे, काहीचे कवितालेखन अजूनही चालू आहे, काही प्रथितयश कवी म्हणून ओळखले जातात. 'विरलेल्या गारा' या पुस्तकाचा आस्वाद डिसें. १९५३च्या 'प्रतिष्ठान'मध्ये प्रसिद्ध झाला. कदाचित हा त्यांचा पहिला आस्वाद लेख असावा. बी. रघुनाथांच्या 'पुन्हा नभाच्या लाल कडा' या कवितासंग्रहावर त्यांनी फेब्रु. १९५६च्या प्रतिष्ठानमध्ये लेख लिहिला. कदाचित कवितासंग्रहावरील आस्वाद स्वरूपाचे त्यांचे हे पहिले लेखन असावे. कविवर्य दे. ल. महाजन यांच्या 'मोत्याची मागणी' या खंडकाव्यास १९६० साली प्रस्तावना लिहिली. तिथपासून पुढच्या वीस वर्षांत त्यांनी किमान तीस कवितासंग्रहांना तरी प्रस्तावना लिहिल्या आहेत. मला माहीत असलेल्या आणि उपलब्ध होऊ शकलेल्या प्रस्तावना इथे संग्रहित केलेल्या आहेत. जिथे कवितासंग्रह त्यांना आवडला, कविता करण्यात यश मिळाले तिथे प्रस्तावनेत ते त्यांच्या कवितेवर लिहितात. पण जिथे असे घडत नसेल तर अशा कवितासंग्रहाला प्रस्तावना लिहिताना कवितांवर लिहिण्याऐवजी ते त्या कवितासंग्रहातील विषयाच्या रचनेच्या निमित्ताने काही वाङ्मयीन प्रश्नांवर लिहितात. परिणामी या सर्व प्रस्तावना कुरुंदकर गुरुजींचा समग्र अभ्यास करणाऱ्यांना उपयुक्त ठरू शकतील अशी आशा आहे. कविता या वाङ्मयप्रकारात मोठ्या प्रमाणात निर्मिती होते. पण अनेक वेळेस रसिकांना आणि कवींनाही गुणदोषांची माहिती मिळावी ही इच्छा असते. सर्वसामान्य रसिकांना तात्त्विक चर्चा करणाऱ्या समीक्षेत फारसा रस नसतो. पण अशा काही सिद्धांतांच्या आधारे सोदाहरण काव्यचर्चा असेल तर ती त्याला अधिक रुचते. पर्यायाने आस्वाद स्वरूपाचे लेखन रसिकांना अधिक डोळसही करीत असते. म्हणून हा लेखसंग्रह वाचकांना उपयुक्त ठरेल असे वाटते. - शंकर सारडा तीन