Jump to content

पान:थेंब अत्तराचे (Themb Attarache).pdf/47

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आस्वाद सार्वत्रिक असतो असे जे मानले जाते त्यात सत्याचा भाग एवढाच आहे.

 आपण जे बालवाङ्‌मयातील गीत घेतो ती अशी सार्वत्रिक आस्वाद्यता असलेली कलाकृती आहे असा काहीजणांचा हट्ट असतो. या हट्टातून ते अशा कविता लिहितात की ज्या कविता लहान मुलांच्यासाठी वेगळ्या अर्थाच्या असतात, प्रौढ वाचकांच्यासाठी वेगळ्या अर्थाच्या असतात. विंदा करंदीकरांच्या-सारख्या सामर्थ्यशाली कलावंत अशी कविता लिहितो की जी आपल्याला जाणवणाऱ्या अर्थामुळे मुलांचे मन मोहून घेते आणि प्रौढांना जाणवणाऱ्या अर्थामुळे त्यांच्याही मनात ती घोळत राहते. असल्या प्रकारची कविता नहुषाप्रमाणे पृथ्वीवर राहून स्वर्गावर राज्य करण्याची धडपड करीत असते. थोडा कमी कसाचा कलावंत असला म्हणजे ती दोन्ही जगे गमावून बसते. बालवाङ्‌मयाने मुलांचे जग पादाक्रांत करताना सहजगत्या प्रौढांचे जग जिंकून दाखवले तर तो एक असामान्य चमत्कार असतो. पण अशा दोन्ही जगांत विजयी होण्याची इच्छा बाळगून कविता लिहिणे ही कलावंताची हिणकस जाणीव मानली पाहिजे. असा कोणताही हिणकस हव्यास वसेकरांच्याजवळ नाही. त्यांच्या वडिलांनी महाराष्ट्रात बालचित्रकलेचे एक प्रचंड आंदोलन सुरू केले, ते आपले प्रौढत्व विसरून सुरू केले. त्यात सुभाष वसेकर आपले प्रौढत्व विसरून सहभागी झाले होते. या बालवाङ्‌मयाच्या जगातही ते आपले प्रौढत्व विसरूनच सहभागी झालेले आहेत.

 एरव्ही वरच्या श्रेणीतील सबंध शैक्षणिक जीवन आटोपल्यानंतर आणि चित्रकलेचे प्राध्यापक म्हणून वावरताना त्यांना माझ्या खुलाशाची गरज नव्हती. त्यांचे असे म्हणणे आहे की आपण आपल्या रसिकांच्यासाठी लिहितो आहोत. या वाचकाला ही कविता आवडणे हे त्या वाङ्‌मयाचे यश. उरलेल्या प्रौढ जगाला ही गीते आवडली तर ते यश हवेच आहे. पण या प्रौढ वाचकांच्यासाठी हा प्रपंच नाही, तसा आग्रह नाही. न मागता तसे दान पडले तर त्याविषयी तक्रार नाही. म्हणून आपले जग सोडून उरलेल्यांना आवाहन करण्यास वसेकर तयार नाहीत. बालवाचकांची अडचण ही आहे की या पराधीन जगात बालजगाविषयी घोर अज्ञान असणाऱ्या, आपले बालपण विसरलेल्या आईबापांची सत्ता चालते. त्यांना या वाङ्‌मयात काय शोधावे हे सांगण्याचे काम करण्यासाठी वसेकरांनी मला निवडले आहे. प्रौढ आईबापांनी ही प्रस्तावना वाचून बालवाङ्‌मयाचा आस्थेने विचार करावा आणि प्रस्तावनेची पाने वेष्टणात झाकून पुस्तक मुलांच्या हाती द्यावे कारण ते त्यांच्यासाठी आहे. प्रस्तावनेचा इतकाच उपयोग असतो.

पऱ्यांची शाळा / ४५