अर्थ असतो. आणि स्वप्नांनासुद्धा त्या जगाचा अर्थ असतो. सुभाष वसेकरांची कविता ही सामान्यत्वे सहा ते दहा गटातील बाल जगातल्या स्वप्नांची कविता आहे. तिला या गटातल्या स्वप्नांचे नियमच लागू झाले पाहिजेत. पऱ्या या जगातल्या स्वप्नांचा भाग आहेत. त्या जगातील सत्य आणि त्या जगातील स्वप्न या दोन्हींनाही स्वप्न मानण्याची गफलत आपण करून बसतो. या स्वप्नांच्या जगात जर शाळा असली तर तिथे गणित असणार नाही. या शाळेत कुणी नापास होणार नाही. या शाळेत जी शाई असेल ती लिहिता आली पाहिजे, उरलेली शाई पिऊन टाकता आली पाहिजे. या जगात कोणी आजारी पडणार नाही आणि जरी कुणी आजारी पडले तरी औषध म्हणून नाचणे, खेळणे, गाणी म्हणणे, गोड खाणे हेच अनुपान राहील. कारण जे आपण प्रौढ आपल्या वास्तविक जगात नाही, पण असावे अशी अपेक्षा करतो तेच आपले स्वप्नरंजन असते आणि जे लहान मुलांना हवे आहे पण त्यांच्या जगात दिसत नाही ते त्यांचे स्वप्नरंजन असते. या स्वप्नरंजनात अतिशयोक्तीलासुद्धा जागा असते. आणि ती अतिशयोक्ती त्या जगाच्या नियमानुसार चालते. जर रोगजंतू शत्रू असतील तर मग त्यांच्यावर तोफा डागायलाच पाहिजेत. मग हे रोगजंतू पडशाचे जरी असले तरी चालतील. अशी अनेक स्वप्ने या जगात आहेत. प्रामुख्याने हे बालमनाचे स्वप्नरंजन आहे. या स्वप्नांत त्यांचा प्रेक्षक किती रमतो ते अजून दिसायचे आहे.
प्रस्तावना प्रस्ताव करण्यापुरती असावी. तो एखाद प्रौढ विवेचनात्मक निबंध नसावा असे मलाही वाटते. पण जाता जाता एक गुंतागुंतीचा मुद्दा स्पष्ट करणे भाग आहे. ती गुंतागुंत माणूस हा प्राणीच गुंतागुंतीचा असल्यामुळे निर्माण झालेली आहे. माणसाचे हे वैशिष्ट्य आहे की त्याच्याजवळ सहानभतीची शक्ती असते. सर्वांच्याच जवळ ही शक्ती असेल असे नाही आणि सर्वांच्या जवळ ही शक्ती सारखीच असेल असेही नाही. पण रसिकांच्या जवळ ही शक्ती गृहीत धरलेली आहे म्हणून हा रसिक वाचक दुसऱ्या देशातील दुसऱ्या सांस्कृतिक जीवनाशीही कल्पनेने समरस होऊ शकतो. तो भूतकाळाशीही समरस होऊ शकतो. म्हणून या प्रौढ वाचकाला कधी कधी बालवाङ्मयाशी समरस होणे जर जमले तर त्यात आश्चर्य वाटायला नको. किती तरी प्रौढ माणसे नियमितपणे 'चांदोबा' वाचतात हे त्यांच्या बालिशपणाचे द्योतक मानावे की त्यांच्या व्यापक सहृदयतेचे लक्षण मानावे याचे उत्तर मला अजून सापडलेले नाही. कारण 'चांदोबा' वाचणारी माणसे इतर व्यवहारात अतिशय कठोर वास्तववादी असलेली दिसतात. उलट बाजूने लहान मुलेही काही प्रमाणात प्रौढांच्या वाङ्मयात रस घेऊ शकतात, खऱ्या कलाकृतीचा