पान:थेंब अत्तराचे (Themb Attarache).pdf/44

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लिहिलेले असल्यामुळे त्यात तीन दोष सारखे डोकावत असलेले मला दिसतात. वाङ्‌मय ज्या प्रेक्षकासाठी लिहिलेले आहे त्याच्याशी त्याचा संबंध असला पाहिजे हे जितके खरे तितकेच ज्या कलावंताने हे वाङ्‌मय लिहिलेले आहे त्या कलावंताशीही या वाङ्‌मयाचा संबंध असणार हे उघड आहे. प्रौढ वाङ्‌मयात कलावंताचे जग आणि रसिकांचे जग यांच्यामध्ये एक सुसंगती असते. बालवाङ्‌मयात कलावंत आपले जग किती विसरू शकतात हाच मुद्दा महत्त्वाचा ठरत असतो. हे आपले जग विसरण्याचा कलावंताचा प्रयत्न तीन वेगवेगळ्या मार्गांनी अयशस्वी होत असलेला मला जाणवत आला आहे. एकतर या सगळ्या लेखकांची अशी काहीतरी समजत झालेली आहे की. प्राणीकथा बालवाङमयाचा भाग असतात. हितोपदेश, पंचतंत्रातल्या प्राणीकथा, इसापच्या प्राणीकथा अतिशय लोकप्रिय म्हणून या मंडळींच्यासमोर असतात. तो साचा नजरेसमोर ठेवून हे आपल्या प्राणीकथांना जन्म देतात, कवितांच्यामध्ये प्राण्यांची वर्णने करू लागतात. प्राणीकथा जरी असली तरी ती जर प्रौढ जगाचा आशय सांगू लागली तर त्यात रस घेणे या बालरसिकाला शक्य नाही. यातून लहान मुलांच्यासाठी लिहिलेल्या वाङ्‌मयातले काही दोष निर्माण होतात. कारण या ठिकाणी बालमन न घेता केवळ शिंग मोडून एखादा प्रौढ बैल आपल्या प्रौढ वशिंडानिशी वासरांच्यामध्ये घुसू पाहत आहे असे वाटू लागते. प्राणीकथा यांतील प्राणी प्रतीकात्मक असतात. हे प्राणी कसे वागतात, कसे बोलतात, त्यांची सुख-दु:खे कोणती आहेत हा जो आशय त्यावर त्या बालवाङ्‌मयाचा वर्ग ठरत असतो. बालवाङ्‌मयातील बहुतेक प्राणीकथा या अयशस्वी प्रौढ वाङ्‌मयातल्या प्राणीकथा असतात.

 या लेखकांची अशी एक समजूत आढळते की एखाद्या प्रश्नासंबंधी प्रौढ माणसे गृहीत धरतात तीच बालपणाची जाणीव असते. शतकानुशतके आपल्या लौकिक जीवनात प्रौढ माणसे ही चूक करीत आली आहेत. ती स्वत:च्या कल्पनेने लहान मुलांच्यासाठी खेळणी आणतात. मुलांना खेळणी आवडतात. ही खेळणी घेऊन खेळताना ती तन्मय होतात. असे या प्रौढांचे गृहीतकृत्य आहे. मुलांनी खेळण्यात रंगून जावे आणि प्रौढांना आपली कामे करू द्यावीत अशी आईबापांची रास्त अपेक्षा असते. अनुभव याहून निराळा आहे. आपल्या आईबापांनी. ही खेळणी घेऊन आपल्याबरोबर खेळावे अशी मुलांची रास्त अपेक्षा असते, अमुक एक बाब लहान मुलांना आवडली पाहिजे, ती त्यांना आवडणे रास्त आहे किंवा लहान मुलांना ती आवडणारच या सगळ्या प्रौढांच्या कल्पना वेळोवेळी विफल झालेल्या दिसतात. आणि त्या विफल होणे भाग आहे. लहान मुलाना.

४२ / थेंब अत्तराचे