जग एकप्रकारचे दिसते. पण लहान मुले स्वत:च्या जगाकडे ज्या पद्धतीने पाहतात त्यावेळेला जगाचे चित्र याहून अगदी निराळे असते. यांपैकी कोणते जग खरे आहे या चर्चेत अर्थ नाही. कारण क्रमाने माणूस बाल्यातून तारुण्यात प्रवेश करतो त्यावेळी आपले जग खरे मानतो आणि जेव्हा तो तरुण वयातन प्रौढ, वृद्ध होतो त्याही वेळेला तो आपलेच जग खरे मानतो. हा मानवी स्वभावाचा एक हट्टीपणा आहे. माणूस ज्यावेळी ज्या वयात असतो त्या वयातले जग तो अधिक खरे मानू लागतो. त्याचा विकास बाल्यातून प्रौढपणाकडे होतो म्हणून प्रौढपणी जाणवणारे जग परमार्थाने खरे आहे यावर प्रौढांचा विश्वास असतो. हाच क्रम जर उलटा असतो आणि माणूस क्रमाने वार्धक्याकडून बाल्याकडे जात असता तर कदाचित मुलांनी गंभीरपणे आपलेच जग कसे अधिक खरे आहे यावर वाद घातला असता. शास्त्राच्या प्रदेशात जेव्हा आपण असतो त्यावेळी कोणते जग खरे आहे याची चर्चा आपण करू शकतो. पण ललित वाङ्मयाच्या क्षेत्रात एक निरपवाद नियम असा मानायला पाहिजे की, ज्या प्रेक्षकांना उद्देशून किंवा ज्या वाचकांना उद्देशून हे वाङ्मय आहे त्या आस्वादकांचे जग हेच त्या वाङ्मयापुरते स्वतंत्र जग आहे.
जे वाङ्मय या बाल्यातील जगाचे प्रौढांना सर्वस्वी आकृष्ट करणारे चित्रण करते पण या चित्रणात त्या बालश्रोत्यांना रस वाटत नाही ते वाङ्मय लहान मुलांच्या दृष्टीने अयशस्वी मानले पाहिजे. बालवाङ्मयातला खरा प्रश्न शब्दांचा नाही. अतिशय सोपे आणि जोडाक्षरविरहित शब्द केवळ जोडाक्षरविरहित आहेत म्हणून या जगात स्वीकारले जाणार नाहीत. अभिधान, अवगमन, अनुमान या शब्दांच्यामध्ये जोडाक्षर नाही पण म्हणून कुणी बालवाङ्मयात हे शब्द वापरणार नाही. आणि दुष्ट, लुच्चा, मठ्ठ हे शब्द जोडाक्षरासहित आहेत म्हणून कुणी बालवाङ्मयातून ते टाळणार नाही. बालवाङ्मयातील शब्दांचा संबंध जोडाक्षरांशी नसून त्या बालजगाशी आहे. हीच गोष्ट शब्दांच्या लांबी-विषयीची आहे. सुरसुरराव फुरफुरराव फुरसुंगीकर असे एखादे नाव लांबट आहे म्हणून बालवाङ्मयातून टाळता येणार नाही. कित्येकदा असे आढळून येते की अतिशय साध्या सोप्या वाटणाऱ्या कल्पना लहान मुलांना समजायला अतिशय कठीण जातात. उलट ज्या कल्पना त्यांच्यासाठी अतिशय सरळ व साध्या आहेत त्या कल्पना कदाचित मोठ्या मंडळींना समजून घेणे कठीण जाईल. बालवाङ्मयाचे निकष या बालश्रोत्याला तिथे तादात्म्य पावता येते की नाही, त्याला हे सगळे खरे वाटते की नाही या ठिकाणी शोधायला हवे. याबाबतचे कोणतेही ओबडधोबड नियम फारसे उपयोगी ठरू शकणार नाहीत.
बालनाट्य, बालगीते, बालकथा असे सगळेच बालवाङ्मय पाहताना ते प्रौढांनी