- सुभाष वसेकर
माझे विद्यार्थीमित्र प्रा. सुभाष वसेकर हे आपला बालगीतांचा संग्रह घेऊन वाचकांच्यासमोर- खरे म्हणजे बालवाचकांच्या समोर येत आहेत. ज्यांच्यासाठी हे पुस्तक लिहिलेले आहे त्यांच्यासाठीच प्रस्तावनाही लिहावी असा एक विचार मनात तरळून गेला. पण बालवाचकांशी बोलायचे तर त्यांना समजेल अशा माध्यमातून बोलायला हवे. जे रंग अगर स्वर आणि शब्द या वाचकांना मान्य असू शकतील त्यांच्याशी माझी ओळख आता विसरली गेली आहे. या विस्मृतीचे कारण एकेकाळी प्रत्यक्षपणे अनुभवलेले सगळे बालपणच आता विसरले गेले आहे. जो प्रौढ माणूस आपले बालपण विसरून जातो त्याच्याजवळ बालपणातल्या स्मृती डायरीतील नोंदीप्रमाणे निर्जीव नोंदी म्हणून शिल्लक राहिलेल्या असतात. या घटना ज्यावेळी घडल्या त्यावेळचे मन, ती चित्तवृत्ती आणि ते अनुभव कल्पनेतसुद्धा जाणण्याची क्षमता संपलेली असते. ज्या मंडळींची ही क्षमता अजून शिल्लक असते तेच बालगीते किंवा बालवाङ्मय या वाङ्मयप्रकारातले यशस्वी लेखक होऊ शकतात असे मला वाटते. बालवाङ्मयातला कोणताही वाङ्मयप्रकार जरी घेतला तरी तो वाङ्मय प्रकार तपासण्यासाठी आरंभ म्हणून आणि गाभ्याचे म्हणून मीही कसोटी वापरू इच्छितो. कोणताही वाङ्मय प्रकार ज्या वाचकांच्यासाठी असतो त्या वाचकांचे एक जग असते. काही प्रमाणात आशा, आकांक्षा आणि स्वप्ने यांनी रंगीत झालेले आणि काही प्रमाणात सत्य आणि वास्तवाच्या योगाने विश्वसनीय ठरलेले असे वाचकाचे जग असते. बालवाङ्मय या-बालवाचकांच्या जगाशीएक रूप झालेले असले पाहिजे ही प्रमुख बाब आहे. उरलेले मुद्दे त्यामानाने अनुषंगिक आहेत. वसेकर आता वयाने प्रौढ झालेले आहेत. पण अजून ते मनाने या लहान मुलांच्या जगात प्रवेश करू शकतात हीच माझ्या मते सर्वांत महत्त्वाची बाब आहे.
लहान मुलांच्याकडे आपण मोठी माणसे ज्या पद्धतीने पाहतो त्यावेळी हे