उदास उद्ध्वस्त निसर्ग कवीने असा रंगवला आहे की जणू या सगळ्याचा तो फक्त साक्षी आहे. हे खरे नसते. आपल्याच जाणिवा आपण परिसरात वेचीत हिंडतो. बाह्य जगात आपलेच पसरलेले मन पुन्हा शब्दांनी सावडायचे असते.
याचा अर्थ कवीला सौंदर्य दिसत नाही असा नाही. कारण माणसाची जिद्द जे आहे त्यातून सुख पाहणारी असते. साकळलेल्या रक्त फुलांना सुद्धा जरतारी फडफड असतेच. (तुफान) चुडा पिचलेला असो, बुडबुडे कितीही क्षणभंगुर असोत, अनोळखी बुबुळे त्यांवर तरंगताना दिसतातच. ओसाड तीरावरील राने आपल्या सावल्या सावरीत घाईघाईने उन्मादाच्या स्वागतासाठी पुढे सरकतातच. (किनारा किनारा) अशा वेळी कवीचे जिद्दी मन बाजूला राहूच शकत नाही. सगळेच जीवन उसवतच जाणार असेल, तर यालाही विरलेल्या वस्त्रांना टीप घालायची तुडुंब घाई आहे. (अंधार वडाची पारंबी) हवा होता तो स्वर मिळाला नाही म्हणून थांबणे थोडेच शक्य असते? चांदणे आपल्या झोपडीवर बरसत नसेल तर चांदण्याची सर झोपडीत खेचून आणावी लागते आणि दारावर तोरणासारखी बांधावी लागते. (तणावा) ओचे बांधून सजलेले जिणे असेच असते. अशा चिवट मनाला सुख, सौंदर्य, उन्माद सापडत नाही असे नव्हे. कडवट लालसर ओठावरला जडशील पाळा त्यालाही दिसतो. रांगणाऱ्या दशा पदराचा तोल सांभाळण्यासाठी धडपडतात. तरण्याबांड सावल्यांची कारंजी काठावरून, उभारून केसात चार चंद्र माळून नदी वाट पाहताना दिसते, पाहता पाहता सारी पायवाटच पोवळ्याची होते. आणि पानाआड पिकावर धुलाई रंगायला लागते. (किनखापी चित्र) पाण्याच्या झाडाला उगवतीचे तांबूस फूल उमलत असतेच. (बाधा)
अस्तित्वाच्या वेशीचे रूप असेच असते. अर्ध्यावर पायवाट चालून झाली तरी अजून आजू-बाजूला पानदेठ हरवून बसलेली झाडेच आहेत हे ती विसरू देत नाही. उराशी बाळगलेल्या व्यथांचाही पाचोळा झालेला असतो. (वाटचाल) तरीही भुकेल्यांना घास होऊ पाहण्याची इच्छा कायम असते. (मी) अनंत एकांतात चाचपडत धुंडाळणे चालूच असते. (भल्या पहाटे) मेंदी खुडणारे हात खुणावीतच राहतात.
राजा मुकुंदांची कविता वाचताना असा समग्र अनुभव सर्वांनाच जाणवेल असे नाही. पण जे आहे ते कोणत्याही आक्रस्ताळेपणापेक्षा निराळे आणि खरे आहे असे मात्र नक्की जाणवेल. तितके यश कवीला पुरे आहे.