पान:थेंब अत्तराचे (Themb Attarache).pdf/40

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

क्षितिजावर उगवत असेल तर तुझे दुःखपिसे वेडच उगवते. (भल्या पहाटे) देवळे भग्न झालेलीच असतात. पण त्यांना साक्षी ठेवून काठाकाठाने अथांग ग्लानी उसवत गेलेली असते. (ओंकारेश्वर) उगवती पहाट या जगात काही प्रसवत नाही. नुसती उसवतच जाते. (लक्ष्मण घळी) दुपार झाली म्हणजे उनाला पूर येतो आणि ते दुथडी भरून वाहू लागते. (कचाटा) गल्ली-बोळांतून गाडग्या मडक्यांतून ही दुपारच भरून ठेवलेली असते. ती तहान भूक विसरून नाचू लागते. (किनखापी चित्र) सायंकाळ याहून अधिक उदास असावी यात नवलच नाही. झाडा-झाडांतून पुरुषभर अंधार वाहात असतो. मुक्या बनात काळोख साचू लागतो. (मुक्या बनात) चंद्र ढळला तरी सांज गहिऱ्या दु:खाचा बहर बहरतच असतो. पापणीच्या दवात अशा कैक रात्री विरघळून जातात. (तरी झिंगलेला कापरा) उन्हाचा उतार झाल्यावर सार्वभौम सायंकाळ येते. (कचाटा) अशा वेळी भेटणारा अंधारा कावेबाजच असणार. (कचाटा) सावल्या तरंगताना मध्येच लोंबकळतात आणि कातरवेळ वितळत जाते. (सय) कभिन्न काळोखाच्या पेचकाडात घरे डोके खुपसून बसतात. झाडे डोळ्यांना दिसत नाहीतच. दिसतात त्या हुंदके देणाऱ्या कळ्या. (सिंधच्या तीरावर) दुपार जशी दुथडी भरून वाहते तशी तळावरची रात्रही वाहतच असते. (तळावरची रात्र)

 एका अर्थी कोंडीत सापडलेल्या या मनासाठी सकाळ, दुपार आणि सायंकाळ या निराळ्या बाबी नाहीतच. न संपणाऱ्या सायंकाळचीच ती वेगळी वेगळी रूपे आहेत. अशा वेळी वैशाखातील ऊन सृजनशक्ती जोपासणारे नसते. ते वैशाखाच्या वणव्यात गळून जाते. त्याला फळ येणारच नसते. (मुक्या बनात) पानापानांतून फुले गळत जातात. ती पानगळ न गळणारी म्हणजे न संपणारी असते. शेतातील सारी नांगरट अपेशी झालेली असते. धारदार वाऱ्याची फक्त धारच नांगरलेल्या शेतातून वाहत असते. (उन्मन) खंदक सुद्धा गाडले जातील, इतका चिखल पावसाळ्यात होतो. (वास्तूच्या प्रतिमा) एका उद्ध्वस्त वस्तूने दुसरी उद्ध्वस्त वस्तू झाकावी त्याप्रमाणे पानझड वावधूळ आवळून बांधू पाहते. (कचाटा) या दळभद्र्या स्तरावर सारी वळणे चुरगळलेली असतात आणि दीपमाळ डोळाभर गोठलेली असते. (इथे रंगलीय सर्वत्र).

 या कोंडीचाच एक भोवरा होतो. त्यातून बाहेर पडण्याची वाटच सापडत नाही. कारण सगळ्याच वाटा धाय मोकलत अनवाणी फिरत असतात. (मुक्या बनात) या वाटाही बारा वाट झालेल्या आहेत. हाकेवर असणारा शून्याचा त्रिशूळ अशावेळी विसरू म्हटले तरी विसरता येत नाही. (शकल) हा सारा

३८ / थेंब अत्तराचे