Jump to content

पान:थेंब अत्तराचे (Themb Attarache).pdf/38

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 एक तर असा समज आहे की, सौंदर्याचा शोध घेण्यासाठी कवी गावातून बाहेर आणि वनात जातात. निसर्ग ही अशी स्वत:च्या स्वाभाविक परिसराबाहेर मुद्दाम जाऊन शोभण्याची जागा आहे. तारे, वारे, वेली, फुले, चांदणे, झरे आणि नद्या या साऱ्या बाबी निसर्गनिर्मित आणि स्वाभाविक आहेत. या वस्तू मानवनिर्मित नाहीत. तसे मोटारी, बंगले यांचे नाही. त्या माणसांना निर्माण कराव्या लागतात. ही मानवनिर्मिती एक तर कृत्रिम आहे, दुसरे म्हणजे उपयुक्ततेच्या हेतूतून तिचा जन्म झाला आहे. जे कृत्रिम आहे, जे उपयोगी आहे ते सुंदर कुठून असणार? सौंदर्य कसे स्वाभाविक असले पाहिजे. उपयुक्ततेचा प्रश्न तिथे अप्रस्तुत असला पाहिजे. मनाच्या एका कोपऱ्यात ‘पापी मानवाचा' स्पर्श न झालेला केवळ पवित्र' असा निसर्ग घर करून असतो. त्याला अनुसरूनच आपला विचार चालू असतो. निदान माझी तरी दीर्घकाळ हीच समजूत होती व ती कवींनीच करून दिलेली होती. त्या समजुतीला फार मोठा धक्का कवीनेच दिला. अतिशय प्राचीन काळापासून कवींनी उषा रथात बसून येताना आणि दागिने घालून सजताना पाहिली आहे. हे रथ आणि दागिने मानवी असूनही प्राचीन कवींना ही निसर्ग सौंदर्याची अलंकरणे वाटली. आपल्या प्रियेची कांती तप्त सुवर्णाप्रमाणे, कापराच्या ज्योतीप्रमाणे आहे असे वाटले. कुणाला वाटले, मेघ मृदंग वाजवीत आहेत. शिशिरात वृद्ध झालेली झाडे वसंतात तरुण होताना कवीला वाटले, हा रंगेल वृद्ध कलप लावून खोट्या तारुण्याचा भास निर्माण करीत आहे. कवींना प्रकृतीच्या दर्शनासाठी संस्कृतीचा व संस्कृतीच्या दर्शनासाठी प्रकृतीचा दिवा लागतो हे पाहताना मला प्रथम आश्चर्य वाटले. हळूहळू आश्चर्य मावळत गेले. ज्याला आपण यंत्र म्हणतो तो संस्कारित निसर्गच असतो. हसण्याचा नाद चांदीच्यासारखा आहे म्हणताना शुद्ध निसर्ग असा नसतोच. एक तर निसर्ग निरुपयोगी नसतो. सारे जीवन अन्न-पाणी आणि निसर्गाचा वापर करून कंठायचे आणि निसर्गाला उपयोगशून्य समजायचे यात विसंगती आहे. दुसरे म्हणजे माणसाच्या साऱ्याच निर्मिती-मागे फक्त उपयुक्तता वाद आहे असे समजणे हा त्याच्या कलात्मक व्यवहारावर अन्याय होय. तिसरे म्हणजे निसर्ग हा केवळ सुंदर नसतो. जीवनाइतकाच तो विविधरंगी असतो. एकएक निरगाठ सुटत चालली तसतशी निसर्ग विरोधी भौतिक संस्कृती या कल्पनेची व्यर्थता मला जाणवू लागली. बालकवीनींच गवताची मैदाने गालिच्यासारखी अनुभवली नाहीत काय?

 जे गावांना कंटाळले होते, माणसांचा आणि समाजाचा ज्यांना वैताग आला होता ते कवी विश्रांती आणि विरंगुळा म्हणून जर गावाबाहेर आले असतील

३६ / थेंब अत्तराचे