'वाट्याला आलेली राख तेवढीच पवित्र' अशी वाचू पाहतो. ज्याच्या झोळीत ही राखच जमलेली आहे; आपण टोळ गोट्याप्रमाणे आहो म्हणून कुठेच चपखल बसू शकत नाही, हे जो जाणतो त्याला कुणी दरवेशी म्हणो, अपेशी म्हणो, खंत करण्याचे कारण नाही. कुणाजवळ बावनकशी सोने असेल, कवीला याचा अभिमान आहे की, त्याची नग्नताच बावनकशी आहे.
टाळ आणि वीणा विकून जर भुकेल्यांची भूक भागवता आली तर ढकराना तान ऐकण्यासाठी यात्रेतला अभंग मध्येच सोडून देण्याची त्याची तयारी आहे. भूक हे एकच जीवनाचे सत्य आहे असे सांगणारे हे तत्त्वज्ञान नाही. टाळ, वीणा निरुपयोगी आहे असे वाटणारे कवीचे मन नाही पण कवितेसाठा नाकरसोडून देणारा हा कवी भूक या महान सत्याचे दर्शन घडल्यानंतर कधी कधी भुकेल्यांच्या-तृप्तीसाठी कविता विकणेही क्षम्य मानू लागतो; इतकाच त्याचा अर्थ आहे. स्वत:चा प्रश्न त्याच्या समोर आहेच. पण सर्वांचा प्रश्नही समोर आहे. आपली झोळी फाटकी आहे याचे भान न विसरता, हे जीर्ण वस्त्रसुद्धा कुणाच्यासाठी गरज असेल तर पांघरण्याची त्याची तयारी आहे. इतरांना झाकताना स्वत: नागवे होण्याचीही त्याची तयारी आहे.
आपल्या प्रियेचे वर्णन करताना कवी म्हणतो, 'नांगरट अपेशी झाली. सुसाट वावटळ सुटली, किनारे कण्हू लागले. तरीही ती ओझे बांधून तयार आहे. आताच क्षितिज पेरायचे गडे, असा तिचा आग्रह आहे.' वाट स्वत:च बारा वाट झाली तरीही ही प्रिया चालतच असते. अंधारवडाच्या पारंब्या पसरलेल्या असोत, पिंपळ पाने अव्याहत गळोत, वस्त्रे विरलेली असोत. 'तरीही सुटत नाही जिद्द.' तरीही तिची व्रतवेडी इच्छा संपतच नाही, हे वर्णन नुसते प्रियेचे नसून तिच्या रूपाने स्वत: कवीचे आहे.
आपली अनुभूती व्यक्त करण्यासाठी लागणारी प्रतिमांची एक समर्थ सृष्टी या कवीने उभी केली आहे. रूढ पद्धतीने सांगायचे तर या प्रतिमा भोवतालच्या निसर्गाशी निगडीत आहेत. माणूस आपल्या भोवतालच्या जगापासून स्वत:ला वेगळे करूच शकत नाही. जे निसर्ग म्हणून ओळखले जाते तेही आणि जे असे ओळखले जात नाही, तेही अनुभवाचा न टळणारा भाग म्हणून कवितेत येते. ज्यावेळी मढेकर स्वत:च्या अनुभवाला वाहक असणारी साधने स्वत:च्या परिसरातून शोधू लागतात त्यावेळी त्याला निसर्ग असे न म्हणता यंत्र म्हणण्याची प्रथा आहे हेच कार्य इतर कवी करू लागले की, त्याला निसर्ग प्रतिमा म्हणण्याची इच्छा होते. दोन तीन अपसमजांच्यामुळे हे असे घडत असावे असे माझे अनुमान आहे.