पान:थेंब अत्तराचे (Themb Attarache).pdf/36

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

फिरत असतो. रात्रीच्या त्या पहिल्या प्रहरात रस्त्यावर भिकारी उभे असतात. दिसेल त्याच्या मागे भीक मागण्यासाठी लागतात. शिव्या, अपमान, हेटाळणी, क्वचित थोडी मारपीट यांपैकी त्या भिकाऱ्यांना कशाचाच संताप येत नाही. त्याचे त्यांना दु:खही वाटत नाही. प्रत्येकाच्या पोटात एवढे मोठे दु:ख भूक म्हणून जागे असते की, त्यांना इतर काही जाणवतच नाही. ज्यांचे अस्तित्वच धोक्यात आलेले असते त्यांना रुसणे, वैतागणे परवडत नाही. त्यांना जीवन निरर्थक वाटण्याचा संभव नसतो. केवळ जिवंत राहण्यासाठी सुद्धा ज्यांना प्रचंड यातायात करावी लागते, त्यांच्यासाठी जीवनातील दुःख खोटे नसते, दु:ख खरेच असते. ते कधी संपेल ही अपेक्षाही नसते. अटळ असे त्याचे स्वरूप दिसते. तरीही त्यावर मात करण्याची जिद्द तितकीच कठोर असते. हे जाणीवपूर्वक करावे लागत नाही. ते आपोआप घडत असते. न ढळणाऱ्या दु:खाचे अंथरूण पांघरूण करणारी, पण या शय्येवर नसणाऱ्या जिद्दीला विसावा देणारी, उद्ध्वस्त परिसराचा भाग झाल्याप्रमाणे उद्ध्वस्त दिसणारी पण एक दिवा विझू न देणारी अशी कविता या पार्श्वभूमीतून जन्मत असते. अशी राजा मुकुंदांची कविता आहे. त्यांच्या जिद्दीचा उगम कोणत्याही राजकीय ध्येयवादातून झालेला नाही. तसा फार मोठा चिंतनाचा आवही नाही. आत अगर बाहेर कोणत्याच रंगाच्या कोणत्याही ताऱ्याने त्यांना उद्याच्या विश्वासाची खात्री दिलेली नाही. जे घडते आहे ते का घडते आहे या विध्वंसाचे गतिशास्त्र पाहण्यात कवीला रस नाही; म्हणून त्याने कोणत्याही व्यवस्थेवर, वर्गावर आगपाखड केल्याचेही दिसणार नाही. जे आहे ते दारिद्रय पत्करून त्या वावटळीत आपण आपणातील माणूस जतन करावा इतकीच कवीची धडपड आहे. खरोखरी यापेक्षा निराळा असा विचार करण्यास त्याला उसंतच मिळालेली नाही.

  'फुलवण्याच्या भावुक गर्दीत, फुलायचे विसरून गेलेला मी' असे राजा मुकूंद यांनी स्वत:चे वर्णन केले आहे. हे वर्णन जितके खरे आहे तितकेच खोटे आहे. खरे या अर्थाने आहे की, फुलण्याची संधीच न मिळालेल्यांना फुलायचे विसरणे भाग असते. खोटे या अर्थाने की, कवीचे हे मन कवितेतून सतत फुलतच आले आहे. कारण फुलणे हे एका पातळीवर नसते. ते वेगवेगळ्या पातळीवर असते. लौकिक जीवनात कवीच्या वाट्याला राखेखेरीज फारसे काहीच आलेले नाही. 'वाट्याला आलेली राखच तेवढी पवित्र' असे तो म्हणतो. माझ्यासारख्यांना असे वाटते की, याही परिस्थितीत राजा मुकुंद आपण माणूस आहो हे ओळखून वागत राहिले. वाट्याला राखच येण्याचे तेही एक कारण होते. म्हणून ती ओळ मी वाचताना 'च' काराची जागा बदलून

३४ / थेंब अत्तराचे