Jump to content

पान:थेंब अत्तराचे (Themb Attarache).pdf/35

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अभिप्राय काही परिणाम करतील असे मानण्याचे कारण नाही. आणि समीक्षकांच्या अनुकूल अभिप्रायानेही फारसा उत्तेजक परिणाम होणार नाही.

 लौकिक जीवनात जे प्रश्न सतत समोर आहेत, ते विसरू म्हटले तरी विसरता येणारे नाहीत. जीवनातील यातनांपासून विरंगुळा म्हणून ही कविता जन्माला आली नाही. आपले स्वप्नांचे एक जग निर्माण करून त्यात सारे काही विसरून रमावे यासाठी जी स्वस्थ व सुरक्षित जागा असावी लागते ती त्यांच्याजवळ नव्हतीच. तसा मनोधर्मही नव्हता. जे जीवन कवी जगला, जगत आला त्याच्याशी एकरूप असणारी, जीवनाची सोबत करणारी, जीवनाचा एक भाग असणारी अशी त्यांची कविता आहे. कोणत्याच भाषेतील साहित्याचा फारसा खोल परिचय नसणाऱ्या कवीने फक्त नकोसे झालेले जीवन शब्दातून मांडण्याचा प्रयत्न केला तर, कविता जशी होईल तशी ही कविता आहे. अगदी अलीकडे नांदेडला आल्यापासून त्यांना कुंती, माद्री, ऊर्मिलेची आठवण होऊ लागली आहे. पूर्वी ते आणि त्यांच्या भोवतालीचा वसलेला आणि न वसलेला परिसर इतकाच त्यांच्या कवितेचा व्याप होता.

 प्रतिकूल परिस्थिती म्हणजे तरी नेमके काय? मनाप्रमाणे मित्र नाहीत, मनाप्रमाणे विलास नाही. मनाप्रमाणे काहीच घडत नाही, ही सुद्धा प्रतिकूल परिस्थितीच आहे. 'भिकार या जगी इच्छित मिळे न काही' इतकीच तक्रार असेल तर ती सर्वांची आहे. या अर्थाने पंतप्रधानांच्यापासून उद्योगसम्राटांच्या पर्यंत सारेजण प्रतिकूल परिस्थितीतच वावरत असतात. कुणाच्याही साठी जरी झाले तरी हवे असणारे जग भोवताली नसतेच. जे सभोवती असते त्यात हवे असणारे फार थोडे असते. या प्रकारची प्रतिकूल परिस्थिती माणसाचा फारसा घात करीत नाही. मन:स्वास्थ्य बिघडले तरी अस्तित्व धोक्यात येत नाही. मनाजोगे मिळत नाही या तक्रारीपेक्षा मिळतच नाही या तक्रारीचे रूपच निराळे असते, कारण तिथे अस्तित्वच धोक्यात आलेले असते. याही परिस्थितीशी झगडणारी माणसे जिद्दी व चिवट असतात. त्यांना हताश होणे, विफल होणे परवडतच नाही. आपला कडवट भाग्यभोग सगळ्याच चवीनिशी पत्करताना सुद्धा त्यांना जिद्द सांभाळणेच भाग असते. राजा मुकुंदांच्या कवितेतील व्यथेचे स्वरूप हे असे आहे.

 फार वर्षांपर्वी मी एक हिंदी कथा वाचली होती. तिचे आता नावही आठवत नाही, लेखकही आठवत नाही. या कथेत पती-पत्नीचे भांडण होते व पती रागारागाने घराबाहेर पडतो. पत्नीने आपला अपमान करावा याचा त्याला संताप आलेला असतो. दु:खही असते. या दु:खातच तो मग्न असतो. रस्त्यारस्त्यांवरून

तणावा / ३३