Jump to content

पान:थेंब अत्तराचे (Themb Attarache).pdf/34

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५. तणावा


- राजा मुकुंद

 राजा मुकुंद यांच्या कवितेला प्रस्तावनेची गरज नाही. आपला स्वत:चा परिचय आपण स्वत:च करून द्यावा हे जे चांगल्या कवितेचे वैशिष्ट्य ते त्यांच्याही कवितेत आहे. गेली कित्येक वर्षे विविध नियतकालिकांतून ही कविता काव्यप्रेमी वाचकांच्या समोर सतत येत होती आणि आपल्या परिचितांच्या परिघात स्वत:विषयी आस्था व आत्मीयता निर्माण करीत होती. नियतकालिकांच्या मधून सुटी सुटी येणारी ही कविता आपल्या सर्व विशेषांच्यासह एका संग्रहात संग्रहीत व्हावी असा आग्रह धरणाऱ्या अनेकांच्या बरोबर मीही एक होतो. म्हणून संग्रहाची प्रस्तावना लिहिण्याचे काम आपोआप माझ्याकडे आले.

 एका नवोदित कवीकडे ज्याप्रमाणे आपण पाहतो त्याप्रमाणे म्हणजे सहानुभूती व उत्तेजनाच्या भावनेने या कवितेकडे कुणी पाहण्याचे कारण नाही. या कवितेविषयी समीक्षकांचे मत प्रतिकूल झाले तर कवीवर त्याचा काही परिणाम होण्याची भीती नाही. प्रतिकूल परिस्थितीचा कोणताही परिणाम जाणवू नये इतका मनाचा घट्टपणा राजा मुकुंदांच्या ठिकाणी फार दिवसांपासून आहे. त्यांच्या जीवनात कोणतीच अनुकूलता कधी नव्हती. स्पृश्य असून अस्पृश्यासारखे, दलितासारखे जीवन दीर्घकाल त्यांनी भोगलेले आहे. भोवताली सहानुभूतिशून्य वातावरण असावे हे त्यांना सवयीचे झाले आहे. फारसे शालेय शिक्षण होण्याचा त्यांचा योग नव्हता. जे थोडे फार शिक्षण झाले तेही एका रेषेत सरळ क्रमाने असे झालेच नाही. शब्दांच्याशिवाय निकट सखा असा दुसरा कुणी त्यांना दीर्घकाळ मिळाला नाही. नागर जीवनात रमण्याची संधीही मिळाली नाही. आपल्या खेड्यात सर्वांच्याच अभावाच्या शेजारी आपलाही अभाव त्यांना जतन करावा लागला. अवहेलना आणि दारिद्रय सतत सहवासायला ठेवूनच त्यांनी माणुसकी आणि कविता या दोन्हीचाही शोध घेतला आहे. ज्या कवीवर उपासमार फारसा परिणाम करू शकली नाही त्याच्यावर प्रतिकूल

३२ / थेंब अत्तराचे