जेव्हा म्हणतो त्या वेळी काही विसरलेलेच नसते. पापणीत गोठविलेले मोती पुन्हा वितळवू नका अशी विनंती पुन्हा त्याच गोठविलेल्या मोत्यांची शपथ घालून जेव्हा आपण करतो त्यावेळी मनाचा शिंपला बंद झालेलाच नसतो. जीवनातील वंचनेचा हा खेळ एकीकडे समाधान देतो; दुसरीकड-हुरहूरही लावतो. लताबाईंनी एके ठिकाणी या घटनेचे मोठे संयमित चित्रण केले आहे. 'कधीतरी लोखंडाचे तुझे दार उघडू दे. माझ्या प्राणाचे पाखरू अधीर झालेले आहे. सारे बळ सावरून मी तुझ्या पायावर डोके ठेवीन. माथ्यावर तुझा आश्वासक हात विसावल्याबरोबर यातनांची फुले होतील.' ही जिद्द ज्या कवयित्रीची आहे तीच मनाचा शिंपला उघडू नका असे म्हणण्याइतकी हळविही आहे हेही आपण विसरून चालणार नाही.
या कविता तसे म्हटले तर विविध आहेत. प्रियकरात रंगणाऱ्या आहेत. आपले सासूपण सुनेच्या हवाली करणाऱ्या आहेत. कुणाच्या वियोगाने रडणाऱ्या आहेत. कुणाची वाट पाहणाऱ्या आहेत. कुणाच्या सहवासात जीवन जगणाऱ्या आहेत. आईवर आहेत. बापावर आहेत. कौटुंबिक आहेत. स्त्रीजीवन सांगणाऱ्या आहेत. प्रतीक्षेत रात्र जागणाऱ्या आहेत. मिठीत भान विसरणाऱ्या आहेत. आपले भाग्य पाहून तृप्त होणाऱ्या आहेत. आपल्या व्यथांनी वैतागणाऱ्या आहेत. पण त्या साऱ्या कविता आहेत. कुणाला त्या कवितांत एक संगती दिसेल; कुणाला दिसणार नाही. कुणाला या कविता अगदीच स्थूल व सपाट वाटतील; कुणाला त्यात सौम्य प्रकाश आणि सूक्ष्म माधुर्य वाटेल. हा ज्याच्या त्याच्या आवडीनिवडीचा भाग आणि अभिरुचीचा प्रश्न आहे. पण एक गोष्ट मी निश्चितपणे सांगू शकेन की या कवितांचा अवतार प्रकाशित होण्यासाठी, इतरांसमोर येण्यासाठी झालेला नाही. तर स्वत:साठी, स्वत:च्या समाधानासाठी झालेला आहे. ही कवितारसिकांच्या पसंतीला पडली अगर न पड़ली याची फारशी तमा कवयित्रीला नाही. आणि हे सारे सर्वांनाच पसंत पडावे असा आग्रहही नाही.
मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने सौ. लताबाई बोधनकर यांच्या कविता या संग्रहात रसिकांच्यासाठी एकत्र करण्यात आल्या आहेत. माझ्या शब्दाखातर लताबाईंनी स्वत:ला सार्वजनिक स्तुतिनिंदेला मुक्त करून दिले व कवितांना तक्रार न करता माझ्या हाती दिले या बद्दल त्यांचे ऋण मान्य करणे माझे कर्तव्य आहे. मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने हा संग्रह प्रकाशित करताना एक संकल्प पूर्ण झाला इतके मात्र समाधान मला नोंदविले पाहिजे.