कदाचित मीरेला मिळाले असेल. कारण मीरेला अनयाशी संसार करावा लागला नाही. कृष्णावरील रति चोरावी लागली नाही. पायांत घुंगरे बांधून सर्व लोकलज्जेचा त्याग करून ती उघडपणे कृष्णाच्या नावाने आपल्या भांगात गुलाल भरू शकली. स्वतंत्ररीत्या ही मीराही आपण समजू शकतो. पण मीरेची रति वेडी आहे हे कळणाऱ्या व्यक्तिमत्त्वास राधेची बाधा कळावी. हा सांधा जुळवणे कठीण जाते. राधा आणि मीरेच्यात जेव्हा सीता येते त्या वेळेला सारेच चित्र अधिक गूढ वाटू लागते. कृष्णात हरवणारी राधा, कल्पित कृष्णात हरवणारी मीरा आणि रामात हरवणारी सीता या खरोखरी पतीत अगर प्रियकरात हरवणाऱ्या व्यक्तीच नव्हेत. कुठेतरी हरवण्यात स्वत:चे आपलेपण प्राप्त करून घेणाऱ्या या तीन स्वाधीनपतिका आहेत. खरे महत्त्व जार प्रीतीला नाही, कल्पितावरच्या प्रीतीला नाही. अगर वैध प्रीतीला नाही; ते वेगवेगळी विशेषणे पांघरणाऱ्या प्रीतीला आहे. जी आपल्यातच राहते आणि आपल्यातच हरवते. आणि स्वत:त हरवून घेताना आपलेच देहभान विसरते. पाण्यातल्या मासळीप्रमाणे पाण्यातच तिचे विश्व पूर्ण होऊन जाते. लताबाईं अशी कविता रचू लागल्या म्हणजे सहजगत्या कुठेतरी खोलवर टिचकी मारून जातात असे मला वाटते.
माणूस स्वत:ची फसवणूक कशी व किती करून घेईल याला काही अंत नसतो. मी आता ते सारे जुने विसरून गेले आहे अशी प्रस्तावना करून ज्यावेळी काय काय विसरले आहे याची सविस्तर आठवण दिली जाते त्यावेळी आपण स्वत:चीच वंचना करीत असतो. जे विसरलेले आहे त्याची पुन्हा आठवण येत नाही. मी अमुक विसरले आहे हे पुन्हा मुद्दाम सांगावे लागत नाही. आता मागचे सारे विसरले गेले आहे. त्यामुळे मनाला पडलेल्या सुरकुत्याही विसरल्या गेल्या आहेत आणि सारे पुन्हा इस्त्री केल्यासारखे स्वच्छ झाले आहे; असे आपण सांगतो त्यावेळी काहीच विसरले गेले नाही याची आपण कबुली देत असतो. 'घडी कडक इस्त्रीची। नको मोडूस मनाची।।' ही विनवणी ही एक प्रकारची वंचनाच असते. खरोखरच जर ते सारे विसरले गेले असेल तर मग सारीच भीती संपते. खरोखरी पापणीत अजून आसवे ताजी असतात. म्हणूनच ती ताजी होतील की काय याची भीती वाटते. जे आर्द्र स्वातीबिंदू होते ते शुष्क मोती झाले आहेत असे आपण उगीचच म्हणत असतो. मुळात जे सारे विसरण्याची धडपड आपण करीत होतो ते शिंपल्यातले मोती आहे असे जोवर वाटत असते तोवर काही विसरलेले नसतेच. पण तरीही जे विसरलेले नाही ते विसरलेले आहे, ते विसरलेलेच राहू द्या; पुन्हा जागे करू नका असे आपण