महत्त्वाचे आहे असे मला वाटते. व म्हणून काव्यात दिसणारे कवीचे प्रतिबिंब खरोखरी लौकिक जीवनात वावरणाऱ्या कवीचे प्रतिबिंबच आहे की काय याविषयी साशंक राहणे बरे असे मला वाटते. सौ. लताबाईंच्या काव्यसंग्रहाला प्रस्तावना लिहिताना हा विचार एकदम माझ्या डोक्यात उसळून आला. तो येण्याचे कारण, सौ. बोधनकर यांच्या कवितेतून कोण्या हौशी टीकाकाराला जर त्यांचा जीवनवृत्तान्त हुडकायचा असेल तर तो त्याने हुडकू नये हे मुळीच नाही. प्रकाशित काव्य सामाजिक मालकीचे होते. त्याचा अभ्यास ज्याला जसा करावयाचा असेल तसा त्याने करावा. हे स्वातंत्र्य मर्यादित करण्यात काहीच अर्थ नाही. या कवितेत कवयित्री हुडकू नका; कारण प्रत्यक्षात ती तशी नाही असे म्हणणे काय अगर या कवितेत कवयित्री हुडका, ती तशीच आहे असे म्हणणे काय, दोन्हीही वाङ्मयीन मूल्यमापनाच्या कक्षेत येत नाही, इतकेच मला म्हणावयाचे आहे. महादेवी वर्मा यांच्या जीवनात दु:ख फारसे नाहीच; पण त्यांची कविता वेदनेत भिजलेली आहे. हा त्या काव्याचा दोष नव्हे. किंवा. लताबाईंची कविता पुष्कळशी स्थूल अर्थाने प्रियकरावर आहे हा या कवितेचा गुणही नव्हे. कविता पतीवर असो वा प्रियकरावर; पती हाच प्रियकर असो की निराळा. आणि कवी पुरुष असून विरहिणीचे चित्रण करो की विधूर असून पत्नीचे मीलन रंगवो या प्रश्नांचा वाङ्मय चर्चेशी फारसा संबंध नाही. जे काव्य काव्य म्हणून डोळ्यांसमोर आलेले आहे त्याचा विषय कोणताही असो, भावनेचा अस्सलपणा जाणवतो की नाही हा खरा वाङ्मयीन प्रश्न आहे. सौ. बोधनकर आणि त्यांचे यजमान दोघेही माझे चांगलेच परिचित आहेत. त्यामुळे काव्यात प्रतिबिंबित झालेली कवयित्रीची व्यतिरेखा खरी आहे की खोटी आहे हे सांगण्याचा मला बराच अधिकार आहे. पण तो मोह यासाठी आवरला पाहिजे की त्याचा वाङ्मयमीमांसेशी संबंध नाही.
लताबाईंच्या कविता वाचताना प्रथमच जाणवत असेल तर त्यांच्या शैलीचा अतीव साधेपणा. या अतीव साधेपणामुळे लताबाईंची कविता जमली की फसली हे चटकन कळते. सजावट म्हणून येणारा कल्पनाविलास अगर सफाईदारपणे साधलेली मुलायम भाषाशैली काही कवींच्या जवळ असते. अशा कवींच्या काव्यात असणारा रितेपणा फार वेळ झाकला जात नाही; पण तो चटकन उघडा पडत नाही. लताबाईंच्या कवितेत ही जादू नाही. त्यामुळे त्यांची जी कविता फसली असेल तिचे फसलेपण उघडे आहे. पण जी कविता जमली असेल तिचे चांगलेपण मात्र तितके उघडे नाही. अतीव साधेपणाने