________________
४. कर्पूर - सौ. लताबाई बोधनकर सौ. लताबाई बोधनकर यांचा कविता-संग्रह मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने प्रकाशित करताना मला एक प्रकारच्या ऋणमुक्तीचा अनुभव येत आहे. ज्या वेळी गुरुवर्य भालचंद्रमहाराज कहाळेकर यांनी मराठवाडा साहित्य परिषदेची सूत्रे आपल्या हाती घेतली त्या वेळेपासून माझा परिषदेशी निकटचा संबंध राहिला आहे. साहित्य परिषदेची नव्याने मांडामांड करताना एक योजना डोळ्यांसमोर होती. मराठवाड्यात प्रकाशन व्यवसाय, व्यवसाय म्हणून स्थिरावलेला नसल्यामुळे, नवोदित लेखकांची एक प्रकारची कोंडी होत असते. म्हणून साहित्य परिषदेने ही कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे कहाळेकरांचे मत होते. त्या काळात अधूनमधून नवोदित लेखकांचे कोणते वाङ्मय प्रकाशनासाठी घ्यावयाचे याचा विचार, अधूनमधून मी व कहाळेकर करीत असू. इतरांशीही कहाळेकर विचारविनिमय करीतच. त्या काळात माझे काम फक्त कल्पना ऐकण्याचे असे. या योजनेखाली काही पुस्तके त्यावेळी प्रकाशित झाली. काही योजना व काही नावे मनात असूनही त्यावेळी साकार करणे शक्य झाले नाही. १९५५-१९५६ साली अशा प्रकारची जी नावे डोळ्यांसमोर होती त्यांत एक नाव सौ. बोधनकर यांचे होते. आमच्या या कल्पनेची वार्ता कदाचित कवयित्रीला नसेल पण गुरु-शिष्यांच्या मनात ती कल्पना होती. परवा मराठवाडा साहित्य परिषदेचा अध्यक्ष या नात्याने पुन्हा एकवार माझ्या सहकाऱ्यांबरोबर जेव्हा मी विचार करू लागलो त्यावेळी चटकन जुने संकल्प पुढे आले. याच संदर्भात या संग्रहाची प्रस्तावना कहाळेकरांनी लिहावी अशी विनंती मी त्यांना केली होती. पण कहाळेकरांचा चिरपरिचित आळस याही ठिकाणी बलबत्तर ठरला म्हणून हे काम मला करावे लागत आहे. ते करताना ऋणमुक्तीची एक जाणीव आहे. यामुळेच सौ. बोधनकर यांना ही अनधिकार चेष्टा रुचेल की नाही हा विचार न करता मी लेखणीला हात घालीत आहे. २६ । थेंब अत्तराचे