नाही. या संस्थानातील वृत्तपत्रस्वातंत्र्य अती-मर्यादित. जवळपास १/३ भाग जहागिरींनी व्यापलेला आणि ज्या थोड्याबहत शाळा होत्या त्यांचा मुख्य हेतू राज्यकारभार चालविण्यासाठी मुसलमान नोकर व अधिकारी तयार करणे हा. मराठी, तेलगू व कन्नडी भाषिकांनी बनलेले हे संस्थान आपली राष्ट्रभाषा म्हणून- राज्यभाषा म्हणून- उर्दुचा पाठपुरावा करीत होते. भारतातील जनता प्रभावीपणे ब्रिटिश राज्यसत्तेच्या विरोधी झुंज देत होती. १९१९ सालाच त्यांना प्रांतव्यवहाराचा काही भाग देण्यात आला होता; पण पूर्ण स्वांतत्र्याखेरीज इतर कशानेही आमचे समाधान होणार नाही ही भूमिका १९२९ सालपासून भारतभर घेतली गेली. हैद्राबादेत १९४६ साली स्टेट काँग्रेसने फक्त 'बंदेगानेआली'च्या कृपाछत्राखाली उत्तरदायी राजवटीची मागणी केली होती. हैदराबाद संस्थानात हिंदूंनी सुरू केलेले कुठलेही काम निजाम सरकारविरुद्ध बंड करण्याचा प्रयत्न म्हणून पाहिले जाई. मराठीतून लेख लिहिणे, भाषणे देणे, शाळा काढणे, मराठी भाषेचा अभिमान धरणे, ऐतिहासिक वास्तूवर मराठीतून माहितीची पाटी लावणे, काहीही राजसत्तेविरुद्ध द्रोह आहे असेच मानले जाई. श्रीयुत महाजन हे निझामी राजवटीतील सरंजामदार. ते मराठीतून कविता करीत, कीर्तने करीत याबद्दल तत्कालीन राजवटीने त्यांचा प्रदीर्घ काळपर्यंत छळ केला. बंदेगानेआलीवर स्तुतिवर्षाव करणाऱ्या मराठी कविता लिहूनही ते सरकारी दृष्टीने काळ्या यादीचे सभासद होते. ही विशिष्ट परिस्थिती ध्यानात घेतली तरच 'मोत्या' या स्वरूपात अस्पृश्यतेचा प्रश्न का चर्चिला गेला हे कळू शकेल.
अस्पृश्योद्धाराचा प्रश्न मुसलमानांच्या संदर्भात चर्चिण्याचे खरोखरी काहीच कारण नाही. मुसलमानांना जे अधिकार आहेत ते हिंदु समाजाने बहाल केलेले नसून जेत्या मुसलमानांनी मिळविलेले आहेत. अकबराच्या राजवटीपासून बहादुरशहाच्या मृत्यूपर्यंत ज्या जमातीचा माणूस दिल्लीश्वर राहिला त्या जमातीला अस्पृश्यही ठरविणे शक्य नव्हते, देवळांत मज्जाव करणेही शक्य नव्हते. उलट अकबराच्या काळापर्यंत धर्मवेड्या मुसलमानांनी केलेले देवळांचे व मूर्तीचे भंजन आणि त्यांनी बसविलेला जिझिया हा कर हिंदुसमाज मुकाटपणे देत होता. खिश्चन अगर मुसलमान हे हिंदू नसूनही त्यांना ज्या मानाने वागविले जाते त्या मानाने अस्पृश्यांना वागवा असे म्हणणे म्हणजे पददलितांनी आपल्या शोषकांच्याकडे जेत्यांइतके महत्त्व आम्हाला द्या असे म्हणण्यासारखे आहे; पण हैद्राबाद संस्थानांतील विशिष्ट परिस्थिती अशी विचित्र की, 'भारत देशांत