प्रकार तुमच्या कवितेत कमी आहे, पण तो संपावा असे वाटते. याचा अर्थ तुम्ही सामाजिक जाणिवांची अभिव्यक्ती सोडावी असा नाही; ती असावीच; पण तिचे अभिनयन व्हावे- जी चीड तुम्हाला वाटते ती तुमच्या कवितांच्यामुळे आमच्या मनात निर्माण व्हावी.
कवितेचा यापुढचा प्रवास समृद्धीचा असतो. तुमची कविता समृद्धीच्या बाबतीत कमी पडते असे मला वाटते. ही समृद्धी म्हणजे नेमके काय? हे मी थोडक्यात सांगतो. समृद्धीचा एक भाग इंद्रिय असतो. इंद्रियांना येणारे सुखदु:खाचे अनुभव कवितेत विविध प्रकारच्या प्रतिमा म्हणून येतात. या प्रतिमा सौंदर्य सांगतात, त्याचप्रमाणे कुरूपता, अभद्रता, औदासीन्य या भावनाही सांगतात. ही प्रतिमाशक्ती तुमच्याजवळ चांगली आहे. तिची जाणीव मात्र रेखीव नाही. म्हणून या प्रतिमांचे विषय निरनिराळे असले तरी प्रतिमांच्यामधून व्यक्त होणाऱ्या भावना मात्र एकसुरी आहेत. विशेषत: आनंद-सुख, विस्मयउन्माद सांगताना, करुण, रौद्र, शृंगार सांगताना या प्रतिमा दुबळ्या वाटतात. आवेग, त्रास, उद्वेग, तिरस्कार सांगताना या प्रतिमांचे सामर्थ्य जाणवते तसे इतरत्र जाणवत नाही. या प्रतिमाशक्तीचा चौरस व चौफेर विकास जाणीवपूर्वक करायला हवा; कारण परिस्थिती कितीही प्रतिकूल असो, माणूस हास्य, आनंद, विस्मय, कारुण्य यांना पारखा नसतो. समृद्धीचा दुसरा भाग अनुभवाचे वैशिष्ट्य आणि वैचित्र्य असतो. हे अनुभवाचे वैविध्य व वैचित्र्य कवितेत आले की प्रतिमांची ही समृद्धी वाढत जाते. तिसरा भाग चिंतनाचा असतो. काव्याचा प्रवास उत्कटतेपासून सुरू होतो व समृद्धीच्या टप्प्यावरून जात सामर्थ्यावर काव्याची पूर्णता होते. ज्या वेळी हे तिन्ही घटक एकजीव होतात त्या वेळी महाकवीचा जन्म होतो.
यासाठी तुम्हाला सभोवतालच्या परिस्थितीकडे तटस्थ म्हणून पाहावे लागेल. दु:ख माणसांच्या जातीच्या माग सनातन आहे. अत्याचार, अन्याय हेही सनातन आहेत व त्यांच्या विरुद्ध झगडाही सनातन आहे. फक्त दलितांनाच दु:ख नाही; ते सर्वांना आहे. फक्त भारतीयांनाच नाही; ते जागतिक आहे. फक्त विसाव्या शतकालाच नाही; ते सार्वत्रिक आहे. माणसाच्या जातीचा इतिहास सर्वत्र अन्याय-अत्याचार-दुःख-उद्वेग-वैताग-किळस, निराशा व बंड, संताप, क्षोभ, विद्रोह, आशा यांच्या संघर्षांनी भरला आहे. या व्यथांच्या शेजारीच सार्वत्रिक व सनातन सौंदर्य-कोमलपणा-माधुर्य-वात्सल्य, रमणीयता, हळवेपणा, हुरहूर यांनी भरलेले उदात्त, विरागी असेही जग आहे. सौंदर्य x कुरूपता,