पान:थेंब अत्तराचे (Themb Attarache).pdf/123

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

निसर्ग म्हणून तर पाहतोच, पण दगडात कोरलेले वाऱ्याचे ध्वनीरम्य सूर नोंदविताना तो दोन्ही प्रकारचा निसर्ग आपल्या अंत:करणाचा प्रतिनिधी म्हणूनही न्याहाळून घेतो. कावळे यांच्या अनुभव घेण्याच्या या पद्धतीचा सगळ्यांत ठळक परिणाम असा झाला आहे की, कविता रूढार्थाने सामाजिक नाही. तशी ती निसर्ग कविताही नाही आणि तिला आशा-निराशावादी अगर पुरोगामीप्रतिगामी म्हणणेही शक्य नाही. परस्परविरोधी ताण एकत्र गुंफणारी आणि अनेक पातळ्यांच्या वर एका क्षणी राहू इच्छिणारी अशी ही कविता आहे. ती फारशी दुर्बोध होत नाही, हीच नवलाई म्हणून सांगणे भाग आहे.

 श्री. कावळे यांच्यासारखा कवी मध्येच बगळे ही कविता लिहितो. यासारखी कविता वाचताना वाचकांना थोडे गोंधळल्यासारखे होणार याला इलाज नाही. बगळा हा ढोंगीपणाचे प्रतीक म्हणून इतका प्रसिद्ध आहे की, तो एक पक्षी आहे व प्रतीक म्हणून न राहता तो आपल्या खऱ्याखुऱ्या स्वरूपात कवितेत येऊ शकतो, हे चटकन समजून घेणे सोपे नाही. या कवितेत खराखुरा बगळा पक्षी म्हणून येतो. मोहाची लाल फुले पाहूनसुद्धा न लोभावणारे व कीटकांचा नाश करीत रानोमाळ भटकणारे बगळे कवितेत अगदी अपरिचित वाटतात. ते अपरिचित आहेत म्हणूनच खरे बगळे आहेत, एरव्ही जे परिचित आहेत ते खोटे बगळे म्हणूनच प्रसिद्ध आहेत.

 श्री. कावळे यांच्या कवितेत इतरांच्या छटा फार थोड्या आहेत. बरीवाईट, जी काही-जशी काही आहे, ती त्यांची कविता स्वत:सारखी आहे. ही कविता वाचून इतर कुणा ज्येष्ठ कवीची आठवण व्हावी, असे प्राय: घडत नाही; पण क्वचित काही ठिकाणी हे घडते. “कालौघ पहा मानव्य चिरडले जात' ही अशी कविता आहे. कुसुमाग्रजांची आठवण झाल्याशिवाय ही कविता वाचलीच जाणार नाही. इतर ज्येष्ठांच्या आठवणी होणार नाहीत, याची काळजी कवीने घेणे आवश्यक असते. पण नजर चुकवून असे काही प्रतिध्वनी मळ ध्वनीत सरमिसळ होत असतात. याबाबत कवींनी दक्ष राहिले पाहिजे.

 कावळे यांची कविता निसर्गाशी बांधलेली आहे हे मान्य करताना मी या कवितेतील सामाजिकतेकडे मुद्दाम लक्ष वेधले; पण सामाजिकता हा घटक या कवितेत दरवेळी नवे नवे रूप घेऊन येतो याचेही भान असणे आवश्यक आहे. समोर असणारे सर्व प्रश्न आपणास कळलेले आहेत आणि त्यांची निश्चित उत्तरेही आपणापाशी आहेत, या निश्चितपणापासून या कवितेचा जन्म होत नाही. प्रत्येक प्रश्नाकडे वेगळ्या पद्धतीने पाहण्याचा छंद या कविमनाला आहे.

अवस्था / १२१