ज्याचे स्मृतिपूर्वक श्राद्ध करायचे त्या सर्वांच्या स्मृतीला आमची साक्ष असते. कावळ्यांचे म्हणणे असे की, आम्हाला आमचा जाणीवपूर्वक स्वीकारलेला रस्ताच सापडलेला नाही. या रस्त्याने की त्या रस्त्याने? हा आमच्या समोरचा प्रश्नही नाही. म्हणून, म्हटले तर सर्वच रस्ते आमचे आहेत, म्हटले तर कोणताही रस्ता आमचा नाही. जग पाहूनसुद्धा फुलाची ओळख न झालेले, सापडलेल्या झाडावर घरटे बांधणारे, खूप ऐकणारे व उगीचच हसणारे आम्ही आहोत.
निरर्थक ओरड ही कावकाव मानली जाते. आम्ही कावळेच आहोत, आम्हीही ओरड करतो, पण जे कावळे नाहीत त्यांनी कावकाव का करावी? पण आम्ही माणसांची निरर्थक ओरडही ऐकतो. निदान कावळे कावळ्यांच्या सारखे बोलतात. त्यांनी माणसांच्याप्रमाणे स्वत:चा आवाज गमावलेला नाही. माणसाच्या न्यायालयात कावळ्याचा बचाव इतकाच आहे की, आम्ही कृतघ्न नसतो. कावळ्याची जातही आम्ही विचारीत नाही. न्यायालयात जर न्याय मिळणार असेल, तर कावळ्याचा निर्णय करण्याची माणसाची लायकी नसते असा निकाल मिळायला हवा. कावळ्यांना सुप्तपणे आपल्यावरही कुणीतरी कविता करण्याची इच्छा असणारच. त्यासाठी त्यांनी अंडी उबवून देण्याचे आश्वासनही दिले आहे; असे कावळ्यांचे अनेकविध संदर्भ या कवितांच्या मधून आहेत. कावळ्यांच्या निमित्ताने मानवी जीवितावर सूचक भाष्येही आहेत. कवीच्या चिंतनाचा एक मोहक विलास-म्हणून या कवितांच्याकडे पाहिले पाहिजे.
कावळ्यांच्यावर प्रस्तावनेचा फार मोठा भाग गेला हे खरे आहे. पण विषय नवा असल्यामुळे तसे करावे लागले. याचा अर्थ 'काही कविता कावळ्यांच्या नावाने' या विभागातील कवितांचे महत्त्व मी कमी मानतो, असा मात्र कणी करू नये. याही कविता चांगल्या आहेत. कोणत्याही कवीचे आद्य महत्त्व मी दोन ठिकाणी मानतो. ही दोन ठिकाणे म्हणजे, परिपूर्ण कवितेचा कळस नव्हेत; ती ठिकाणे म्हणजे कवितेचा आरंभ. कविता हा वाङ्मयप्रकारच सूचित अर्थावर जगणारा आहे. कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त अर्थ भरा असे जेव्हा कवीला सांगितले जाते, त्यावेळी 'तुझा शब्द खूप अर्थ सुचवणारा असावा' हेच सांगायचे असते. शब्दांच्यामध्ये लपलेल्या सूचक अर्थाचा शोध कवीला घेता आला पाहिजे. हा पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे. कवितेला एक लय असते, ती जितकी शब्दांची, तितकीच ती आशयाचीही असते. कवीला ही लय सांभाळता आली पाहिजे. कवितेचा आरंभ या दोन ठिकाणांच्यापासून होतो असे मला वाटते.