पान:थेंब अत्तराचे (Themb Attarache).pdf/112

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

याचीही सूचना येऊन जाते. समुद्राच्या शेजारीच नेमके मऊ वाळूचे किनारे का आढळतात? हा प्रश्न मधेच उभा राहतो. समुद्रहदयस्थ वणव्यांनी किनारे पेटत नसतात याची मधेच नोंद असते. सर्व जग उलथून टाकण्याची प्रतिज्ञा करीत असतानाच रस्ते तर सोडाच पण घरातही दगडफेकीची भीती वाटते, याचीही नोंद येऊन जाते. उत्तरे मागता मागता आणि उत्तरे देता देता आपण प्रश्नांत गुरफटतो आहोत याची जाणीव होते. या कवितेत जिज्ञासा कधी संपतच नाही. म्हणून येथील प्रश्नपर्वांना कधी शेवट नसतो. सगळे ज्ञान आणि सर्व अक्षरे काढून पुसून टाकली तरी त्यामुळे पुसले काहीच जात नाही. उलट निरनिराळ्या बाजूंनी निरनिराळ्या बाबी एकमेकांत अधिक गुंतून गेल्यासारख्या दिसू लागतात. जेव्हा लिहिलेले असते तेव्हा निदान काय लिहिले आहे हे नक्की असते. पुसून काढण्याच्या प्रयत्नात पुसले काहीच जात नाही. उलट जे लिहिले, ते अर्धवट वाचता वाचता, जे लिहिलेच नाही तेही लिहिले होते असे वाटू लागते. म्हणून एकाच वेळेला दोन भिन्न बाजूंनी ही कविता जाणवायला लागते. फुलांच्या रांगा, फुलपाखरांचा दंगा आणि वेलीला तलवारी टांगा या तिन्ही घोषणा एकमेकांत मिसळून जातात. कारण इथे जो चिमण्यांचा थवा आहे त्यातील काही चिमण्या स्नान झालेल्या आहेत, काही चिमण्या घाम झालेल्या आहेत, काही चिमण्या न्हाण आलेल्या आहेत. त्या साऱ्यांचा सरमिसळ किलबिलाट चालू आहे.

 ही कविता देशकालाचे सर्व बंध हळूवारपणे उतरून ठेवीत सतत प्रतिमांच्या मधून बोलत असते. आणि या प्रतिमा कधी नवे शब्द घडवून येताना, कधी शब्दांशी खेळताना मधेच शब्द फाडून टाकतात. स्वप्नाळून येणे, संचारणारा मक सूर्य, कढणारे, फेसाळ, फेडता येणारे आभाळ; थकलेली क्षितिजे, काजव्यांनी विझलेली रात्र, गोंदय, टेंभाळणारा सूर्य, निर्वासित झालेली हाडे, सोलून काढलेले पूल, कफनात बांधलेली कणसे, खुनेरी पावलांवर घरंगळुन जाणाऱ्या दिशा, शरीरतेची आक्रंदने, सिमेंटपक्षी, अंधारदऱ्या, ओठांची पालखी, प्रश्नायन, हळूवार भुंकणारा कुत्रा, जखमानंद आणि त्याची दिंडी, चांदणे पुरणारे भोयी- या प्रयत्नांतून निर्माण होणारी एक आरास आहे. प्रतिमांच्या मधूनच उमलणारी ही कविता सातत्याने थेट आणि वक्र वेढे घेणारी आहे. ही सरळ गुंतागुंत म्हटली पाहिजे.

 आपल्या कवितेचे जिवंतपण आणि आपले निराळेपण घेऊन ही कविता वाङ्मयाच्या जगात प्रवेश करीत आहे. तिच्याहीसाठी एक रांगोळी प्रस्तावनेची!

११० / थेंब अत्तराचे