स्वप्नाळूपणामुळेच आशा आणि निराशा दोन्ही उत्कट होत असतात. श्रीपाद जोशींच्या कवितेत नैराश्य, वैफल्य यांची उणीव नाही; तशी ती आधुनिक वाङ्मयात कुठेच दिसत नाही. पण निराशेच्या पेक्षा क्षोभाचा वावर या कवितेतून जास्त आहे. क्षोभाला जोड म्हणून आशा आणि भविष्याविषयीची श्रद्धाही असते. वैफल्य आणि निराशा आहे पण त्यामुळे उद्याची आशा संपलेली नाही. भविष्याची खात्री आहे, काही चांगले घडेल अशी आशाही आहे; पण त्यामुळे आजच्या उद्ध्वस्तपणाचे भान बोथटलेले नाही. अशा दोन्ही पातळ्या एकाच वेळी सोबतीला घेऊन वावरणारे असे श्रीपाद जोशींचे मन आहे. मला वाटते मनाच्या या घडणीतच त्यांचे निराळेपण आहे. या दृष्टीने त्यांची 'अजून' केवळ कविता म्हणून पाहायचे तर या कवितेत असणाऱ्या प्रतिमांच्या नुसत्या विसंवादी जोड्यासुद्धा जी गुंतागुंत निर्माण करतात ती पाहाण्याजोगी आहे.
एका लांबच लांब गद्य वाक्याचे तुकडे पाडून ओळीने रचावे अशी या कवितेची रचना आहे. पहिली गोष्ट तर अशी आहे की, या कवितेत रांगोळ्या घालण्याचे काम समाधी करते आहे. येणाऱ्याचे स्वागत करण्यासाठी रांगोळ्या घातल्या जातात. इथे रांगोळ्या घालण्याचे म्हणजे स्वागताचे काम समाधी करतेच. सामान्यपणे समाधी ही उदास आणि व्यथित असते. या कवितेतील समाधी रसरसलेली आहे. रसरशीतपणा हे ज्या समाधीचे वैशिष्ट्य ती समाधी आहे कुणाची? तर ती आहे मावळलेल्या घराची आणि रांगोळ्या काढल्या जातात ते कुणी तरी पणती आणून ठेवावी या आशेने. अजून पणती कुणी आणन ठेवलेली दिसत नाही; पण म्हणून केव्हा तरी या रांगोळ्या पणतीच्या स्वागताच्या ठरतील, ही आशा अजून संपलेली नाही. जिच्या मनातली आशा संपलेली नाही अशी ती वस्तू कोणती आहे? ही अजून निराश न झालेली आशा न संपलेली म्हणूनच तर ही समाधी, समाधी असूनही रसरसलेली आहे.
जे घरच मावळलेले आहे त्याची समाधी ही काही मोठी मन उल्हसित करणारी घटना नव्हे. ही समाधी रांगोळ्या घालते आहे, पण म्हणून कुणी पणती आणून ठेवलेली नाही. मावळलेले घर, न आलेली पणती आणि समाधी यांच्या शेजारी पणतीची आशा, रांगोळी आणि रसरसणे हे सगळेच घेऊन एक आंगण उभे आहे. हे आंगण एका मावळलेल्या घराचे म्हणून जितके उदास, उजाड असणार तितकेच ते रांगोळी घालून पणतीची वाट