Jump to content

पान:थेंब अत्तराचे (Themb Attarache).pdf/105

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शोधण्यातच या कवीचे मन गुंतलेले आहे. काव्याचा विचार करताना आपण सूक्ष्मता आणि समृद्धी असे शब्द वापरीत असतो. एका अर्थी या दोन शब्दांनी आपण एकच आशय सांगत असतो, हे आपल्याला चटकन जाणवत नाही. सूक्ष्मतेचा आणि संवेदनाक्षम मनाचा सगळा प्रयत्नच प्रत्येक अनुभवाचे निराळेपण शोधण्याकडे असतो. आणि जाणवलेले प्रत्येक निराळेपण शब्दबद्ध करीत असतानाच वाङ्मयाची समृद्धी वाढत असते. आपली कविता जोरकस आणि प्रभावी व्हावी याची धडपड करण्याच्या प्रयत्नात ज्या वेळेला इतकेसे प्रभावी ठरू न शकणारे घटक वगळण्याची प्रक्रिया सुरुवात होते, त्यावेळी कविता नुसती एकसुरी होत नाही तर ती स्थूल आणि साचेबंद होते. केवळ आक्रोश, यामुळेच वाङ्मयनिर्मितीला अपुरा पडतो.

 'सळाळ' हा श्रीपाद जोशींचा कवितासंग्रह वाचताना जर प्रथम मला जाणवले असेल तर हे की, या कवीच्या मनाने.कोणताही साचेबंदपणा स्वीकारलेला नाही. आपण बोधवादी ठरू या भीतीने अगर धास्तीने हा कवी सामाजिक जाणिवा विसरायला तयार नाही आणि सामाजिक जाणिवा हे आपले क्षेत्र आहे. या जाणिवेने तो जीवनातील प्रेमाचे स्थानही नाकारायला तयार नाही. अजून एक प्रकारच्या साचेबंदपणाचा उल्लेख या संदर्भातच केला पाहिजे. काही कवी असे असतात की, त्यांच्या प्रेमकवितेला सामाजिक जाणिवेचा वाराही स्पर्शत नाही आणि सामाजिक कवितेला कोठे मानवी मनातील दुबळेपणाचा वासही स्पर्शत नाही. ते सामाजिक कविता लिहिताना प्रचारक असतात आणि प्रेमकविता लिहिताना रंजनवादी होतात. श्रीपाद जोशींच्या कवितेत हाही प्रकार नाही. कोणत्याच प्रकारची वर्गवारी त्यांच्या कवितेत फार काळ टिकत नाही. आपण एक व्यक्ती आहोत, या व्यक्तित्वाचे निराळेपण आणि आपण समाजघटक आहोत याची जाणीव या दोन्ही जाणिवा या कवितेत परस्परांत मिसळून गेलेल्या आहेत. मराठी नवकवितेतीलही कोणता एक विशिष्ट आग्रह अगर साचा स्वीकारण्याची तयारी नसणाऱ्या तरुण कवींत श्रीपाद जोशींचा समावेश केला पाहिजे असे त्यांचे सर्वच आग्रह असणारे आणि कोणताही एक विशिष्ट आग्रह नसणारे मन. या मनाचा व्यापक अनाग्रही असा कल आणि सगळ्याच जाणिवा मान्य करणारे असे त्यांच्या कवितेचे स्वरूप ही या कवीची महत्त्वाची कमाई म्हटली पाहिजे.

 स्वप्नाळूपणा हा कवीचा धर्मच असतो. व्यवहारात या स्वप्नांना वाव सापडत नाही. यामुळे निर्माण होणारे वैफल्य, निराशेचे घनदाट सावट जरी कवितेवर पसरलेले असले तरी त्याही मागे स्वप्नाळूपणा असतोच. या

सळाळ / १०३