पान:तरंग अंतरंग.pdf/१११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मी वाचलेला कै. अनिल बाजूला तो भला प्रचंड कैलास पर्वत वर त्यापेक्षाही आ वासून पसरलेलं अफाट आकाश ....आणि काय वाट्टेल ते झालं तरी कैलास प्रदक्षिणा पूर्ण करायचीच, या जिद्दीनं ती हिमालयाची पर्वतराजी तुडवत चाललेला मी एकटा. सारं अगम्य, अविश्वासार्ह, गूढ, दिव्य ! अगम्य एवढ्यासाठीच की, माझ्या 'स्पायनल कॉर्ड' च्या चौथ्या-पाचव्या मणक्याचे 'पाऊल' वाकडे पडल्याने, मणक्याच्या माळेने त्यांना किंचित धक्का मारून 'विस्थापित' केले होते. त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यायला गेल्यावर डॉक्टर म्हणाले होते. चार इंच खोल व पाच-सहा इंच लांब कट घेऊन 'त्या' वाट चुकलेल्या मणक्यांच्या 'क्लॅम्प स्क्रू' ने मुसक्या बांधून पुन्हा कधी वाकडं पाऊल पडणार नाही, असा बंदोबस्त करायला हवा. यावर मुलगा, अनिरुद्धने काळजीपोटी व थोडा दिलासा मिळेल, या उद्देशाने डॉक्टरांना विचारले, "याचे विपरीत परिणाम काय ? आणि अयशस्वी शस्त्रक्रियेची शक्यता किती ?" त्यावेळी डॉक्टर फोनवर इतरांशी बोलत- बोलत म्हणाले, "१०० टक्के अयशस्वीही होऊ शकते." (ज्याअर्थी तडफदारपणे बाणेदार उत्तर दिले, त्याअर्थी बहुधा सौभाग्यवती बरोबर, ती समोर नसल्याने रुबाब करण्यासाठी बोलत असावेत.) आम्ही उडालोच ! उडून पुन्हा खुर्चीवर पडल्यावर मला एक अंधूकशी गोड शंका आली. बहुधा घाबरून ते दोन चुकार मणके आपापल्या जागी निमूटपणे जाऊन बसले असावेत. त्यांनाही १०० टक्के अपयश पचले नसावे; पण तसे व्हायचे नव्हते. आमचे रडवे (म्हणजे नेहमीचेच ) चेहरे पाहून फोन खाली ठेवून डॉक्टर मागील विषयाचा धागा धरून पुढे म्हणाले, "मी आजतागायत तीन हजार असल्या शस्त्रक्रिया केल्या आहेत. त्यातला एकही पेशंट परत आलेला नाही." हे स्टेटमेंट तर भयानकच होते. मी प्रश्नार्थक मुद्रेने त्यांच्याकडे पाहिले, तर अत्यंत लाघवी शब्दात खुलासा करत डॉक्टर म्हणाले, "म्हणजे कसलीही तक्रार घेऊन पुन्हा कुणी आलेले नाही हो ! तुम्ही अजिबात घाबरू नका." मी पण आता 'वीरश्री' संचारून म्हणालो, "मी कुणाच्या बापालाही घाबरत नाही. (तुमच्याही). " अर्थातच, हा अर्धा भाग मात्र मी मनातल्या मनात म्हणालो. हो, उगीच शत्रक्रियेअगोदर डॉक्टरांना 'जखमी' करायला नको, असा आपला साधा, सरळ विचार आणखी एक रागीट विचार आला. डॉक्टरांना अगोदर उत्साहवर्धक पूर्ण सकारात्मक असे सत्य सांगायला कुणी कसे शिकवले नाही ? ....तरी बरे पुरुष गर्भगळीत होत नाहीत! आणि इथूनच मी ठरवलेली कैलास प्रदक्षिणा पूर्ण करण्याचे मनात पक्के केले. विचार केला की, समजा आपल्या डॉक्टरांची नेमकी तीन हजार एकावी शस्त्रक्रिया चुकली तर माझी कैलास प्रदक्षिणाच चुकायची. माझा कैलास प्रदक्षिणेचा विचार पक्का झाल्यावर सर्व काळजी करणारे हवालदिल झाले. ( ज्यांच्याकडून माझे पैसे येणे बाकी होते ते सोडून) १११ / तरंग अंतरंग