पान:तरंग अंतरंग.pdf/११०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बक्का माझी मोठी आत्या बक्काचा ( बकुळा आत्त्या) उल्लेख मागे एका लेखात केला होता. स्त्रियांच्यासाठी तो भयानक काळ होता. आठव्या-दहाव्या वर्षी लग्न झाल्या - झाल्या विधवा होऊन, वपन करूनच लांब सडक केस गमावून 'आलवण' नेसूनच माहेरी पाठवलेल्या या माझ्या आत्त्यानं आपला जन्म कसा काढला असेल ? याची कल्पनाही करवत नाही. दर महिन्या-दीड महिन्यांनी घरी बोलावलेल्या न्हाव्याकडून अंधेऱ्या खोलीत मान खाली घालून मुकाट्याने डोकं साफ करण्याशिवाय बिचारीपुढं पर्यायच नव्हता. कुणाला माहीत, कदाचित ती त्या वेळी मूकपणे अश्रूही गाळत असेल ! स्त्रियांना इतका भयानक भोग कधीच भोगावा लागला नसेल, एवढी क्रूर वागणूक नवीन लग्न होऊन आलेल्या परकरी मुलीला द्यायला कुणालाही काहीच कसे वाटले नसेल? नुसते ऐकूनसुद्धा आपल्या डोळ्यांत पाणी आल्याशिवाय राहत नाही; मग 'त्या' निष्पाप कोवळ्या वयातल्या मुलीला काय वाटत असेल? कधी-कधी ती पायरीवर बसलेली असताना आजूबाजूच्या खेळणाऱ्या मुलींपैकी लांब ; पण विस्कटलेल्या केसांची मुलगी दिसली की एखादी हाक मारून, घरातून तेल आणून बक्का छान विंचरून झक्कास वेण्या घालून तिला पाठवत असे.. ती असं का करत असावी, असा आज विचार केल्यावर आपले लांब सडक केस जन्मभरासाठी हरवून बसलेल्या बक्काच्या वेदनेचा अंदाज येतो. कुणाचे तरी केस विंचरून स्वतःचेच केस विंचरत असल्याचे ती समाधान करुन घेत असेल का ? या नुसत्या विचारानेही बेचैन व्हायला होतं, गलबलायला होतं. गंभीरपणे विचार केल्यावर सारं आयुष्य निमूटपणे, कोमेजलेल्या फुलासारखं घालवणारी त्या काळची स्त्री ते आजची व्यक्तिस्वातंत्र्याची मुभा घेऊन, फॅशन म्हणून पूर्ण वपन करणारी नवतरुणी यात खूप अंतर आहे. अनेक बँकांच्या किंवा 'डब्ल्यूएचओ' सारख्या संस्थेच्या अत्युच्च पदावर सहजपणे आरूढ होणारी आजची स्त्री... हॉकी, क्रिकेट, कुस्ती, बॅडमिंटन, टेनिससारख्या खेळात जागतिक स्तरावर आव्हान उभी करणारी आजची स्त्री... खूपच सक्षम आहे. सहजपणे विमान उडवणारी, बिनधास्तपणे यानातून अंतराळ प्रवास करणारी आजची स्त्री, एअरफोर्स, आर्मीमध्ये निधड्या छातीने कॅप्टन होऊन मिरवणाऱ्या आजच्या स्त्रिचा हा सारा प्रवास निश्चितच जमीन-अस्मानाचा फरक दाखवणारा आहे. बंधनमुक्त भारतीय स्त्रीला स्वतःच्या बुद्धीच्या बळावर, पूर्ण विकासाच्या मार्गाने नेणारा हा प्रवास. माझ्यासारख्या अनेक सामान्य माणसांना चकित करणारा आहे. निःसंशयपणे उत्तम भविष्य असलेला आणि काळाची ग्वाही देणारा आहे. स्त्रियांनी केवळ स्वसामर्थ्याच्या आणि बुद्धीच्या बळावर मिळवलेले हे दिव्य यश पाहूनच अनेक बक्कांच्या त्या वेळच्या सहन केलेल्या मानसिक आणि शारीरिक छळाला मनोमन सलाम करून आपण आपले समाधान करू शकतो; निदान मला तरी अमाप समाधान आज मिळते.... कदाचित बक्कासारख्या होरपळून गेलेल्या स्त्रियांचे बळंच.... त्या तिपेडी वेणीतून त्या पुढच्या पिढीला आशीर्वादासारखे पोहोचवत असतील... असा एक विचार मनाच्या पटलावर तरंग उमटवून गेला.

तरंग अंतरंग / ११०