पान:ज्योतिर्विलास.pdf/176

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ज्योतिर्विलास. उल्का , रात्री सहज आकाशाकडे नजर गेली असतां एकादी तारा तुटून पडली असें दिसते. उपोद्घातांत अशा एका तारेचे वर्णन आपण वाचलेच आहे (पृष्ठ ५). कधी कधी तर अशा तारांची वृष्टि होते. सन १८८५ मध्ये नोव्हेंबरच्या २७ व्या तारखेस झालेली वृष्टि आमच्या वाचकांपैकी पुष्कळांनी पाहिली असेल. व ती त्यांच्या स्मरणांतून कधी जावयाची नाही. त्या रात्री दर मिनिटांत सुमारे १०० हून जास्त तारका पडल्या. सगळ्या मिळून सुमारे लाख पाऊण लाखाहून जास्त पडल्या असाव्या. आकाशांत आपणास नेहमी ज्या तारा दिसतात त्याच तुटून पडतात असें प्रथम वाटते. परंतु एक लक्ष तारा तुटून पडल्या असतां आकाश ओस पडावें. आणि असें तर कांहीं पूर्वोक्त वृष्टीच्या रात्री झाले नाही. नेहमी तारा तुटतात त्यांच्या योगाने आकाशांतल्या तारा हळु हळु कमी व्हाव्या, परंतु तसे होत नाही. यावरून तारा तुटतातशा वाटतात ते वस्तुतः दुसरे काही तरी पदार्थ आहेत हे उघड आहे. त्यांस उल्का म्हणतात. आकाशाच्या एका भागी लक्षपूर्वक पाहिले तर दर तासांत सरासरी ६ उल्का पडलेल्या दिसतात. तेव्हां सगळ्या दृश्य आकाशांत सरासरी १०।१५ उ. का दर तासास पडतात. पूर्वरात्रीपेक्षां उत्तररात्री जास्त पडतात. उष्णकटिबंधांत त्या जशा तेजस्वी दिसतात तशा इतर कटिबंधांत दिसत नाहीत. त्यांचे रंग तांबडा, पिवळा, नारिंगी, हिरवा, पांढरा, निळा असे अनेक प्रकारचे असतात. कांही उल्का अगदी बारीक असतात. त्या पळभर दिसून आकाशांत वरचेवर नाहीशा होतात. काही त्यांहून मोठ्या असतात. त्या मोठ्या झपाट्याने आकाशाचा बराच भाग क्रमून जमिनीवर पडल्याशा दिसतात. त्यांचें तेजही बरेच असते. आणि कांही तर खाली येतां येतां फारच मोठ्या होतात. कधी कधी शुक्राहूनही फार मोठ्या दिसतात. कधी चंद्राएवढ्या दिसतात, व त्यांचे तेजही शुक्र किंवा चंद्र यांसारखें किंवा त्याहून अधिक असते. व त्यांचा प्रकाशही पडतो. एकादे वेळी मोठी गर्जना होऊन त्या दिसतनाशा होतात. एकादी उल्का एकदां मोठी होऊन पुनः लहान होते. कधी कधी एकादी मोठी उल्का फुटून तिच्या निरनिराळ्या उल्का बनून खाली येतात. एकादे वेळी ह्या स्फोटाचा आणि गर्जनेचा कडाका इतका असतो की धरणीकंप होत आहे की काय असा भास होतो. एकादे वेळी एकादी मोठी उल्का खाली येऊन जमीन, पाषाण इत्यादिकांचे विदारण करिते. हिला वराहमिहिरादिकांनी 'अशनि' असें नांव दिले आहे. (बृ० सं० अध्याय ३३). अशाच प्रकारच्या मोठ्या उल्कांनी कधी कधी पृथ्वीवर दगडांची वृष्टि होते. ह्या दगडांस आपण अशनि अथवा उल्कापाषाण म्हणूं. आपल्यास आकाशस्थ गोलांच्या द्रव्याचे प्रत्यक्ष ज्ञान होण्याचे साधन काय ते हे अशनि होत. बाकी त्यांसंबंधे आपले सर्व ज्ञान अप्रत्यक्ष आहे. म्हणून