पान:ज्योतिर्विलास.pdf/७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५७
रजनीवल्लभ.


च्या सुमारास रोहिणीपिधान होऊन पुढें कृष्णपक्ष लागला, आणि अमावास्येस अगदी दिसेनासा झाला. अशा वेळी ही कल्पना उद्भवलेली असावी. पुढे आदित्य म्हणजे सूर्य ह्यास चरु देऊन हवन केले तेव्हां चंद्र वृद्धि पावू लागला असे वरील कथेत आहे, हे लक्षात आणण्याजोगे आहे. अमावास्येच्या दिवशी चंद्र आदित्याजवळ असतो. आणि पुढे त्याच्या प्रकाशामुळे चंद्रकला वाढू लागतात. तेव्हां आदित्याची प्रार्थना तारांनी केली व त्याच्या कृपेनें चंद्र वृद्धि पावू लागला हे ठीकच आहे.

 अमावस्येच्या दिवशी चंद्र हा सूर्याजवळ असतो, ही वास्तविक स्थिती वेदांत वर्णिलेली आहे. म्हणजे याबद्दल भलतीच अज्ञानाची समजूत त्या वेळी सर्वांची नाही. तसेच आदित्य हा चंद्रास किरण देतो असेंही वेदांत स्पष्ट म्हटलेले आढळते. चंद्रास प्रकाश आदित्य देतो, आणि तो प्रकाश कमीही करितो यामुळे, आणि आदित्य हा शब्द प्रथम सूर्याचा मात्र वाचक असलेला मागाहून देवांचा वाचक झाला यामुळे, चंद्राच्या कला देव प्राशन करितात अशी कथा उद्भवली असे दिसते. वेदोत्तरकालीन ज्योतिषग्रंथांत तर चंद्रकलावृद्धिक्षयाचे वास्तविक कारण आहेच. वराहमिहिर म्हणतो, " आरशावर पडलेले सूर्यकिरण मंदिरात प्रकाश पाडितात, त्या प्रमाणे उदकमय चंद्रावर पडलेले सूर्यकिरण रात्रीच्या अंधाराचा नाश करितात. सूर्याच्या खालून निघून चंद्र पुढे (पूर्वेस ) गेला म्हणजे त्याचे पश्चिम अंग शुक्ल होते. या प्रमाणे प्रतिदिवशी चंद्र जसजसा सूर्यापासून दूर जातो तसतसा त्याचा शुक्ल भाग वाढत जातो. उन्हांत एकादा घट ठेविला असतां अपराह्नीं त्याचा पश्चिम भाग अधिक अधिक शुक्ल होत जातो, त्याप्रमाणे चंद्राचे होते." यांत चंद्राच्या पृष्ठभागी जेथें उदक आहे तेथून सूर्यकिरण परावृत्त होऊन पृथ्वीवर चांदणे पडते, अशी कल्पना आहे. चंद्रपृष्ठाचा जो भाग काळा दिसतो चंद्राने धारण केलेला ससा किंवा हरिण आहे अशा कल्पना उद्भवल्या त्याप्रमाणे जो भाग चकचकीत दिसतो तेथे पाणी असावे अशी कल्पना होणे हे त्याहून अधिक स्वाभाविक आहे. दुर्बीण प्रथमच प्रचारांत आली तेव्हां तींतून दिसून आले की, चंद्राचा जो भाग चकचकीत दिसतो तो पर्वतांची शिखरे व ज्वलतपर्वतांची मुखे यांनी उंचसखल झालेला आहे; आणि काळा भाग दिसतो तो सपाट आहे. त्यावरून पाश्चात्य ज्योतिष्यांनी प्रथम असें अनुमान केले की, काळा दिसतो तो चंद्राने धारण केलेला समुद्र आहे, व चकचकीत भागी जमीन आहे. परंतु पुढे मोठ्या दुर्बीणीनी चंद्राचे वेध झाल्यावर चंद्रावर पाणी मुळीच नाही असा निर्णय झाला.

 पृथ्वीपासून चंद्राचे मध्यम अंतर २,४०,००० मैल आहे. कधी ते याहून १९००० मैल कमी होते, कधी जास्त होते. इतक्या अंतरावरून चंद्र आपल्या

-----

 १ ऐतरेय ब्राह्मण, ४०.५. २-तैत्तिरीय संहिता, २.४.१४ आणि ३.४.७. 3-बृह- श्लो०३, ३, ४.