पान:ज्योतिर्विलास.pdf/७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५६
ज्योतिर्विलास.


अर्थातच क्रांतिवृत्तापासून त्याचे अंतर मुळीच नसते. म्हणजे त्या वेळी शर शून्य असतो. क्रांतिवृत्ताच्या आसपास सवापांच अंशांच्या आंत ज्या तारा आहेत म्हणजे ज्यांचा शर सवापांच अंशांहून जास्त नाही, त्यांचे पिधान चंद्र करितो. परिशिष्ट १ ह्यांत तारांची क्रांति दिली आहे. विषुववृत्तापासून क्रांतिवृत्ताचें अंतर सुमारे २३|| अंश आहे. आणि चंद्र कधी ह्याच्या दक्षिणेस किंवा उत्तरेस असतो. म्हणून चंद्राची परम क्रांति कधी सुमारे २८|| अंश होते, कधी सुमारे १८। अंशच होते. याहून जास्त ज्यांची क्रांति असेल त्या तारांचें पिधान कधी होण्याचा संभव नाही. चंद्रकक्षा आणि क्रांतिवृत्त यांचे पात म्हणजे राहुकेतु स्थिर नाहीत; त्यांस गति आहे. ( आणि म्हणूनच हे आमच्या ज्योतिषांत कल्पिले आहेत. वस्तुतः हे दृश्य किंवा द्रव्यघटित पदार्थ नाहीत. ) १८॥ वर्षांत क्रांतिवृत्तांत एक फेरा करितात. यामुळे क्रांतिवृत्ताच्या कोणत्याही बिंदूशी चंद्राचा शर सर्वदां सारखा नसतो. कधी शून्य असतो, कधी सवापांच अंशांपर्यंत असतो. यामुळे एका तारेचें पिधान चंद्र एकदां करूं लागला म्हणजे सुमारे २ वर्षे करितो; पुढे करीनासा होतो. तो पुनः १८|| वर्षांनी करूं लागतो.ज्या तारा क्रांतिवृत्तावर किंवा त्याच्या अगदी जवळ आहेत त्यांचे पिधान १८॥ वर्षांत दर खेपेस दोन दोन वर्षे असें दोनदा करितो. वर ज्या नक्षत्रांचे पिधान चंद्र करितो असे सांगितले त्यांतील बहुतेकांच्या सर्व तारांचे पिधान तो १८॥ वर्षात केव्हा ना केव्हां तरी करितो. जेव्हां करीत नाही, तेव्हां त्यांच्या उत्तरेकडून किंवा दक्षिणेकडून जातो.

 कधी कधी बुधशुक्रादि ग्रहही चंद्राच्या सपाट्यांत सांपडून त्यांचेही पिधान चंद्र करितो. ग्रह बहुधा पहिल्या प्रतीच्या तारे एवढे किंवा त्याहून मोठे असतात. यामुळे त्यांचे पिधान पाहण्याची विशेष मौज असते.* कधी कधी तारा आणि ग्रह यांचे पिधान एककाली होण्याचा संभव आहे. बुधाला रौहिणेय नांव आहे, ह्या गोष्टीचे मूळ ह्या पिधानांत आहे. बुध आणि रोहिणी यांचे एकेकाली पिधान झाले असतां त्या वेळी चंद्रबिंबांतून बुध बाहेर पडला असें पाहून रोहीणीचंद्रसमागमापासून बुध हा पुत्र झाला अशी कल्पना होण्याचा संभव साहजीक आहे. गुरुपत्नी तारा हिचे हरण चंद्राने केले आणि तिला बुध हा पुत्र झाला या कथेतली तारा म्हणजे वस्तुतः रोहिणी नामक जी तारा ती होय. बुधाला रौहिणेय अशी संज्ञा आहे, त्याप्रमाणे इतर ग्रहांसही अशा संज्ञा आहेत. त्या फारशा प्रसिद्ध नाहीत; तरी पुराणांत त्या आहेत. शुक्र, मंगळ ह्यांस अनुक्रमें मघाभू आणि अषाढाभू अशी नावे आहेत. त्या त्या तारा, ते ते ग्रह, यांच्या एककालिक निकट समागमापासून ती नांवें पडली यांत संशय नाही.

 सर्व स्त्रियांस सारखे वागवीन अशी प्रजापतीपाशी शपथ वाहिल्यावर चंद्राने पक्षपात केला म्हणून त्यास राजयक्ष्मा झाला अशी कथा वर सांगितली

-----

 * पुढील दोन तीन वर्षांत होणारी ग्रहांची पिधाने त्यांच्या वर्णनांत सांगितली आहे.