पान:ज्योतिर्विलास.pdf/६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४६
ज्योतिर्विलास.


 पाश्चात्य राष्ट्रांत विश्वरचनापद्धतिविवेचनाची तीन परिवर्तने झाली. पहिली पद्धति टालमीची, दुसरी कोपर्निकसाची, आणि तिसरी न्यूटनाची. टालमी आणि हिपार्कस यांच्या पूर्वी पिथ्यागोरास म्हणून एक ग्रीक ज्योतिषी होऊन गेला. त्याचे मत पृथ्वी सूर्याभोवती फिरते, आणि सूर्य हा विश्वाचा मध्य आहे, असे होते. असे म्हणतात. परंतु तें तो प्रसिद्धपणे लोकांस सांगत नसे. प्राचीन ग्रीक लोकांचा कल शास्त्रसिद्ध नियमांपेक्षां कल्पनातंरगांकडे विशेष होता. त्याप्रमाणेच पिथ्यागोरास याचा होता. तसेच त्याचे मत म्हणून लिहिलेले आढळतें तें इतकें गूढ, अलंकारिक, आणि संशयित आहे की, त्यांतलें संशयरहित असें तत्त्व काढणे कठिण आहे. यामुळे त्याचे मत शास्त्रीयरीत्या बनले होते की नाही याचा संशय आहे. इ० स० पू० तिसऱ्या शतकाच्या सुमारास झालेल्या एक दोन ग्रीक ज्योतिष्यांचे मत पृथ्वी आपल्या आंसाभोवती फिरते असे होते, असे लिहिलेले आढळते. आमच्या देशांतील प्रसिद्ध ज्योतिषी पहिला आर्यभट (इ० स० ४९९) याचे मत पृथ्वी आपल्या आंसाभोवती फिरते, असे होते.

 टालमी इत्यादिकांच्या तीन पद्धतीचे स्वरूप पाहूं.

 टालमीची प्रद्धति येणेप्रमाणे:-पृथ्वी गोल आहे. ती आकाशांत निराधार असून सर्व विश्वाच्या मध्यबिंदुस्थली आहे. तिला गति मुळीच नाही. अवकाशस्थ सर्व ज्योति पूर्णवर्तुळमार्गाने पृथ्वी भोवती फिरतात. त्यांत सूर्यचंद्रादी सात ग्रह पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरतात.

 या प्रकरणाच्या आरंभी सकृदर्शनी होणारे मनुष्याचे ज्योतिषविषयक आद्य ज्ञान सांगितले, त्याच्या पुढची पायरी वरील कलमांत आहे. इजिप्तच्या वगैरे लोकांच्या ज्ञानाची दुसरी पायरी मागे सांगितली तिचे हे एक पूर्वांग म्हटले तरी चालेल. बरेच दिवस अवलोकन आणि विचार करून पहिल्या पायरीवरून ह्या पायरीवर जाणे साहजिक आहे. आणि या गोष्टी एकाच मनुष्याच्या जन्मांत त्यास कळून येण्यासारख्या आहेत. टालमीच्या पूर्वीही ह्यांतल्या बहुतेक कळलेल्या होत्या. पुढे टालमीच्या पद्धतीतल्या आणखी गोष्टी लिहिल्या आहेत, त्या माजी एका पिढीच्या अवलोकनाने समजणाऱ्या नाहीत. त्यांस बराच काळ लोटला पाहिजे. त्यांची पायरी तिसरी आहे.

 टालमीचे मत आणखी असें होतें की ग्रह पृथ्वी भोवती फिरतात. त्यांत चंद्र अगदी जवळ आहे. त्याच्या पलीकडे बुध आणि शुक्र आहेत. त्यांच्या पलीकडे सूर्य फिरतो. आणि त्याच्या बाहेरून मंगळ, गुरु आणि शनि हें फिरतात. ह्यांचे मार्ग बरोबर वर्तुळ दिसत नाहीत, व त्यामुळे त्यांची गति सर्वदा सारखी नसते. बुधादि पांच ग्रहांची गति सर्वदां सारखी नसून तीत आणखी एक विशेष दिसतो. सामान्यतः पाहिले असतां ते तारापुंजांतून पश्चिमेकडून पूर्वेकडे जात आहेत असे दिसतात. (म्हणजे अश्विनीतून भरणीत, भरणीतून कृत्तिकांत, याप्रमाणे चालतात.) परंतु कधी कधी ते उलटे चालतातसे दिसतात. (म्हणजे कृ-