पान:ज्योतिर्विलास.pdf/६१

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


आकाशस्थ ज्योतींविषयी लोक काय म्हणत आले ?  ४५

पासूनचे त्यांचे लेख भरंवशाचे दिसतात. त्या वर्षी सूर्याच्या अयनकालच्या उन्नतांशांवरून त्यांनी सूर्याचे परम क्रांतिमान २३ अंश ६४ क० ३ वि० ठरविलें; व तेव्हां अयनें अमुक नक्षत्री झाली असे लिहिले आहे; हे बरोबर मिळते. त्यांनी इ० स० पू० ७२२ पासून इ० स० पू० ४०० पर्यंत ३६ ग्रहणे लिहिली आहेत. यांतील बहुतेक बरोबर मिळतात. इ० स० १६४ पासून पुढें त्यांनी काही केलेले देसत नाही. त्यांच्या इतर विद्याकलांप्रमाणे ज्योतिषशास्त्राचीही पुढे वाढ झाली नाहीं. ग्रहगतीचा विचार त्यांनी मुळीच केला नाही.

 प्राचीन पारसिकांस नक्षत्रज्ञान आणि चांद्रसौरमानांचे ज्ञान होते असे दिसते. यांहून त्यांची जास्त गति ज्योतिषशास्त्रांत झाली होती, असे दिसत नाही.

 सारांश चांद्रमास आणि सौरवर्ष यांचे स्थूल किंवा बरेंच सूक्ष्ममान, व ह्या दोहोंचा धर्मकृत्यांत आणि व्यवहारांत उपयोग, चंद्रसूर्यांच्या मार्गातील नक्षत्रे किंवा राशि आणि काही इतर राशि, इतक्या गोष्टींचे ज्ञान वर सांगितलेल्या प्राचीन राष्ट्रांस होते. तसेच काहींनी चंद्रसूर्यांची ग्रहणे कधी झाली, हे लिहून ठेविले आहे; काहींना ती कधी होतात ह्यासंबंधे व सूर्याच्या स्थितीसंबंधे बरेंच महत्त्वाचे ज्ञान प्राप्त झाले होते; व कोणी कांहीं तारांचे उदयास्त पाहत असत; असे दिसून येते. ज्योतिषज्ञानाची अगदी पहिली पायरी प्रथम सांगितली, तिच्या वरची ही दुसरी पायरीरी म्हटली असतां चालेल. हिचेही महत्त्व त्या कालाच्या मानाने पुष्कळ आहे. पायरीवर येण्यास केवळ एकाद्या मनुष्याचा किंवा एका पिढीचा अनुभव पुरावयाचा नाही. तथापि बुधादि पांच ग्रह, त्यांच्या गतीचे नियम, त्यांची उपपत्ति, आणि ग्रहांची कोणत्याही वेळची स्थिति, म्हणजे ग्रह कोठे असेल हे अगोदर काढणे ह्यांचे ज्ञान खाल्डियन, इजिप्शन, चिनी आणि पारसीक या राष्ट्रांस होते असें म्हणण्यास सांप्रत कांहीं आधार नाही.

 हे ज्ञान ज्यांस होते अशी पृथ्वीवर प्राचीन राष्ट्रं काय ती दोन होत. एक भारतीय आर्य, आणि दुसरे ग्रीक लोक. ग्रीक लोकांत हिपार्कस नामक ज्योतिषी इ० स० पू० १५० च्या सुमारास झाला. ग्रीकपद्धतीच्या उत्पादकत्वाचा मान सर्व ज्योतिषी हिपार्कसास देतात. सूर्यचंद्रांच्या गतिस्थिति काढण्याचा ग्रंथ त्याने केला होता. आणि बुधादि ग्रहांच्याही गतीविषयी नियम त्यास समजले होते. तो कुशल वेधकारही होता. त्याने अयनगति ठरविली होती. आणि तारांचे वेध करून १०८० तारांचें स्थितिपत्रक (क्याटलाग) तयार केले होते. सांप्रत त्याचा ग्रंथ उपलब्ध नाही. टालमीच्या ग्रंथावरून ह्या सर्व गोष्टी समजतात . टालमीच्या ग्रंथांत १०२८ तारांचे शरभोग इ० स० १३८ या कालचे आहेत. टालमी हा प्रख्यात ज्योतिषी इ० स० १५० च्या सुमारास होऊन गेला. त्याचा सिंटाक्स नामक ग्रंथ हल्ली उपलब्ध आहे. त्या ग्रंथाचे लोकप्रसिध्द नाव आलमाजेस्ट हे आहे. १४०० वर्षेपर्यंत पाश्चात्य लोकांत आणि आरब लोकांत ईश्वरप्रणीत ग्रंथासारखें त्याचे पूज्यत्व होते.